जळगाव : पुण्यातील नांदेड सिटी परिसरात स्वतःच्या सुनेचा निर्घृण खून करून फरार झालेल्या सासऱ्याला शनिवारी ९रोजी मेहरुण परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत. भानुदास भास्कर चौधरी असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, गेल्या आठ दिवसांपासून तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर जळगाव पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला असून त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुणे येथील रायकर मळा परिसरात राहणाऱ्या भानुदास चौधरी याने २ मे २०२६ रोजी किरकोळ घरगुती कारणावरून आपली सून स्वाती तेजस चौधरी हिच्या डोक्यात गंभीर वार करून तिचा खून केला होता. अमानुषता इतकी की, सुनेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सोडून आणि घराला बाहेरून कुलूप लावून आरोपी पसार झाला होता. घरातील लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी पती तेजस चौधरी यांना कळवले. त्यांनी घरी येऊन पाहिले असता स्वाती ही मृतावस्थेत आढळली होती. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात खुनाचा (BNS १०३ (१)) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा केल्यानंतर आरोपी भानुदास चौधरी हा जळगावात येऊन लपला होता. मात्र, जळगाव एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय बातमीदाराकडून पक्की खबर मिळाली की, सदर आरोपी हा मेहरुण परिसरातील महादेव मंदिर भागात वास्तव्य करत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला
जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकात पीएसआय शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, राहूल रगडे, रविंद्र कापडणे आणि प्रदीप चौरे यांचा समावेश होता.