जळगाव | शहरातील शाहू नगर भागात एमडी ड्रग्जची साठवणूक करून विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला शहर पोलिसांनी कारवाई करून अटक केली आहे. त्याच्याकडून ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी आनंद निकुंभ आणि प्रफुल्ल धांडे गस्तीवर असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की, शाहू नगरातील एका घरात एमडी ड्रग्जचा साठा करून विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी , 22 रोजी रात्री शहर पोलिसांनी शाहू नगर येथे छापा टाकून सर्फराज जावेद भिस्ती (वय-२३, रा. शाहू नगर, जळगाव) याच्या घरातून ५ लाख ३४ हजार रुपये किंमतीचा ५३.४० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन पुड्या हस्तगत केल्या , सर्फराज जावेद भिस्ती याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्फराज जावेद भिस्ती याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्टअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे हा संशयित आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस आता त्याने हे ड्रग्ज कुठून आणले, त्याचा पुरवठादार कोण आहे आणि नेमकी कोणाला विक्री करत होता याचा तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी काही महत्त्वाच्या धाग्यांपर्यंत पोलिस पोहोचण्याची शक्यता आहे.
या कारवाईत शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, सुनील पाटील, रणजीत पाटील आणि पोलीस कर्मचारी सतीश पाटील, प्रफुल्ल धांडे, योगेश पाटील, चंद्रकांत सोनवणे, उद्धव सोनवणे, प्रणय पवार, अमोल ठाकूर आणि विजय निकुंभ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर एमडी ड्रग्जचा पुरवठा रोखण्यात यश आले आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांविषयी पोलिसांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.