Minor girl assault case Pudhari
जळगाव

जळगाव: महाविद्यालयीन तरुणीला व्यसनाच्या जाळ्यात ओढून अत्याचार

मैत्रिणीसह तिघांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : शहरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने सिगारेट आणि ड्रग्सचे व्यसन लावून एका तरुणाच्या जाळ्यात ओढण्यास मदत केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. संशयित तरुणाने पीडितेवर कारमध्ये अत्याचार करून तिचे नग्न फोटो काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी ३ जून रोजी रात्री उशिरा रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यसनाची सवय आणि अत्याचाराची सुरुवात

रामानंद पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पीडिता आणि तिची मैत्रीण एकाच शाळेत शिकत होत्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये पीडिता मैत्रिणीच्या घरी जेवायला गेली असता, दुसऱ्या दिवशी मैत्रिणीने तिला पहिल्यांदा सिगारेट दिली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पीडितेचे आई-वडील गावाला गेले असताना, मैत्रिणीने तिला दिनेश निर्मल तिवारी याच्यासोबत कारमधून नेले. तिथे त्यांनी दारू, सिगारेट आणि गांजाचे सेवन केले. त्यानंतर मोहरी रोडवरील कारमध्ये दिनेशने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे नकळत नग्न फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार हॉटेलवर बोलवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पीडितेच्या मैत्रिणीनेच तिला या व्यसनाच्या आहारी लावले, असे फिर्यादीत नमूद आहे.

घरातून पळवून नेणे व विनयभंग

१९ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपीने धमकी देऊन पीडितेला घरातून पळवून नेले आणि १५ एप्रिल २०२६ पर्यंत तिला आपल्या घरी ठेवले. त्यानंतर पीडितेने निर्मलच्या घरी जाण्यास नकार दिला असता, निर्मलचा मित्र गौरव पुरोहित याने तिला स्नॅपचॅटवर अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केला. याशिवाय, जय चौधरी नावाच्या तरुणाने पीडितेच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दोन ते तीन वेळा ड्रग्स आणून दिल्याची माहितीही समोर आली आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित तरुणीने तिच्या वडिलांच्या समक्ष रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध पोक्सो (POSCO) कायद्यासह इतर विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ड्रग्स आणि गांजाची अवैध विक्री चर्चेत

या घटनेमुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींना शहरात ड्रग्स आणि गांजासारखे अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आधीच्या एका एमडी (MD) प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहे, तर नुकताच भुसावळमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला होता. यावरून जिल्ह्यात ड्रग्स आणि गांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असून ते विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होत असल्याचे समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT