जळगाव : अडावद पोलिसांनी एका महिलेला वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करून तिच्या कमाईवर उपजीविका करणाऱ्या पती-पत्नीविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.17) रोजी करण्यात आली.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील चंद्रकांत सुपडू सोनवणे (45) आणि त्याच्या पत्नी शीला चंद्रकांत सोनवणे (42) यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दोघांनी मूळ हिंगोली जिल्ह्यातील येलदरी येथील एका महिलेला त्यांच्या घरात ठेवले होते. तपासात असे समोर आले की त्यांनी पीडितेला जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले आणि तिच्या कमाईचा स्वतःसाठी वापर केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या रघुनाथ मराठे यांनी तक्रार दाखल केली. अडावद पोलिसांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.