जळगाव : घराच्या वाटणीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि.9) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात मृत बाळू राजेंद्र शिंदे याचे वडील आणि भाऊ यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द येथे राहणाऱ्या राजेंद्र शिंदे यांच्या कुटुंबात घराच्या वाटणीवरून काही महिन्यांपासून वाद सुरू होता. या वादातूनच राजेंद्र शिंदे आणि त्यांचा मुलगा भारत शिंदे यांनी बाळू शिंदे याच्यावर शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने चेहऱ्यावर व छातीत जबर मारहाण केल्याने बाळूचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना बुधवारी (दि.9) रोजी सकाळी समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलीस पाटील सुनील पाटील यांनी तातडीने भडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी वडील राजेंद्र शिंदे आणि भाऊ भारत शिंदे यांना अटक केली आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.