प्रातिनिधीक छायाचित्र AI Photo
जळगाव

Jalgaon Burglary : बोदवडमध्ये भरदिवसा दुकान फोडून लाखाचा मुद्देमाल लंपास! शहरात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडी, पोलिसांचा धाक संपला?

चोरटे सुसाट : पत्रकाराचे कार्यालय, कपड्यांचे दुकान अन् आता जनरल स्टोअर्सवर डल्ला; व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट

पुढारी वृत्तसेवा

​जळगाव : शहरासह तालुक्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत असून चोरट्यांनी पोलिसांना उघड आव्हान दिले आहे. शहरात सलग तिसऱ्या दिवशी घरफोडीचे सत्र सुरूच ठेवत गुरुवारी भरदिवसा रेणुका माता मंदिर परिसरातील ‘सहेली जनरल स्टोअर्स’चे छताचे पत्रे उचकटून चोरट्यांनी तब्बल १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यात ६० हजार रुपयांची रोकड आणि ४० हजारांच्या स्टेशनरी साहित्याचा समावेश आहे. एकापाठोपाठ एक घडणाऱ्या घटनांमुळे व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे सावट पसरले आहे.

​भरदिवसा फोडले दुकान

महावीर मेडिकलच्या मागे राहणारे व्यावसायिक राजेंद्र रामाकिसन अग्रवाल (वय ६०) यांचे रेणुका माता मंदिराशेजारी ‘सहेली जनरल स्टोअर्स’ नावाचे दुकान आहे. ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास अनिल पांडुरंग माळी यांनी अग्रवाल यांना फोनवरून माहिती दिली की, दुकानाचे वरचे पत्रे तोडून चोरी झाली आहे. अग्रवाल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, दुकानातील साहित्याची नासधूस झाल्याचे दिसले. चोरट्यांनी काऊंटरमधील रोख ६० हजार रुपये आणि अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे स्टेशनरी साहित्य असा एकूण १ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​तीन दिवसांत तीन चोऱ्या

​१ सप्टेंबर: बसस्थानकाजवळ असलेले पत्रकार सुरेश कोळी यांच्या कार्यालयाची भिंत फोडून चोरट्यांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि २० हजार रुपयांची रोकड पळवली.

​२ सप्टेंबर: बसस्थानक परिसरातीलच अमोल घुले यांच्या ‘रॉयल चॉईस मेन्स वेअर’ या दुकानाचा मागील दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न झाला.

​३ सप्टेंबर: रेणुका माता मंदिराशेजारील सहेली जनरल स्टोअर्सचे पत्रे उचकटून भरदिवसा १ लाखाचा डल्ला मारला.

​सलग घडणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक पोलिसांच्या गस्तीवर आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रात्रीच्या चोऱ्यांनंतर आता भरदिवसा दुकाने फोडण्यापर्यंत चोरांची मजल गेल्याने, बोदवड पोलिसांनी आता तरी सुस्ती झटकावी आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी तीव्र मागणी नागरिक व व्यापारी वर्गातून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT