जळगाव : चोपडा तालुक्यातील वैजापूर या ठिकाणी काळवीट, या वन्यप्राण्याची शिकार करुन त्यांचे मांस व शिंगे विक्री करण्यासाठी येत असताना त्यांना चोपडा ग्रामीण व वन विभागाने पकडले असता त्याच्या कडून कळविटाचे मांस व शिगे जप्त करण्यात आली .
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज 17 रोजी वाहतुक केसेस करणारे पोलीस हवालदार राकेश तानकु पाटील व पोलीस कॉन्स्टेबल गजानन मच्छिद्र पाटील यांना गोपनिय खबऱ्यामार्फत खबर मिळाली की, मोटर सायकल क्रमांक एम पी १० एन सी ४८५७ हीच्यावरुन वांगऱ्या बारेला रा. टाक्यापाणी, वरला आणि त्याचा साथीदार असे वैजापुर आणी परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार आहेत . ही माहीती मिळाली असता पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव, कविता नेरकर, पोलीस उपअधिक्षक चोपडा उपविभाग, आण्णासाहेब घोलप यांना माहिती देण्यात आली. वन्यप्राण्याच्या तस्करी संदर्भात असल्याने सदरची माहीती फॉरेस्ट अधिकारी यांना दिली.
फॉरेस्ट कम्पार्टमेट २३६ बोरअजंटी ते वैजापुर या रस्त्यावर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सफौ राजु महाजन, राकेश पाटील, गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनिल कोळी, आणि वनविभागाचे आर एफ ओ, विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी आर बारेला, वनरक्षक बानु वारेला, वनरक्षक योगेश सोनवणे यांचे समवेत नाकाबंदी करीत असतांना ११.४५ वाजता दोन व्यक्ती मोटर सायकल क्रमांक एम पी १० एन सी ४८५७ हिच्यावरुन चोपडाकडून वैजापुर कडे जातांना मध्यभागी पिवळ्या प्लॅस्टिकच्या गोणीतुन काहीतरी वाहतुक करतांना दिसले.
त्यांना थांबवून त्यांचेकडील गोणीमध्ये काळवीटाची (हरण) दोन शिंगे आणि प्लॅस्टिक काळ्या बॅगमध्ये ठेवलेले काळविटाचे मटण (मांस) मिळुन आले. सदर आरोपी वांगऱ्या फुसल्या बारेला वय ४८ रा. टाक्यापाणी, ता. वरला, जिल्हा बडवाणी (म.प्र), धुरसिंग वलका बारेला वय ४५ वर्षे, रा. बरुड, ता. जि खरगोण, (म.प्र), यांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध वन्यजिव संरक्षण अधिनियम १९७२ मधील शेड्युल १ मधील प्रतिबंधीत काळवीट या प्राण्याची शिकार केल्याने त्यांचे विरुध्द वनविभागामार्फत पुढील कारवाई करण्यात येत आहे.