जळगाव

Jalgaon Crime : जळगाव हादरले! देहविक्रीच्या अड्ड्यावर सापडली 'बांगलादेशी' तरुणी; आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

सुरक्षेला गंभीर धोका, जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत चालणाऱ्या देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत केवळ अनैतिक व्यापाराचा पर्दाफाश झाला नाही, तर देशाच्या सुरक्षेला गंभीर आव्हान देणारे एक धक्कादायक आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले आहे. निमखेडी रोडवरील 'ब्रह्मांडनायक अपार्टमेंट'मध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत ताब्यात घेतलेली २८ वर्षीय तरुणी बांगलादेशी नागरिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. 'झाकिया अबुल काहेर फोकर' (मूळ रा. खुलना, बांगलादेश) असे या तरुणीचे नाव असून, तिने भारतात वास्तव्य करण्यासाठी बनावट आधार कार्ड तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव पोलिसांच्या या सतर्कतेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २१ मे रोजी निमखेडी रोडवरील ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमध्ये कुंटणखाना चालवला जात असल्याची खात्रीशीर माहिती जळगाव तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी अचानक छापा टाकला. या कारवाईत मुख्य संशयित सागर सोनवणे (रा. धरणगाव) आणि सीमा उर्फ कविता मोरे (रा. जळगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम (पीटा) अंतर्गत गुन्हा (गु.र.नं. १५१/२६) दाखल करण्यात आला आहे.

पोलिसी खाक्यामुळे 'चलाखी' उघड

या कारवाईदरम्यान पोलिसांनी दोन तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी 'आशादीप' सुधारगृहात केली होती. मात्र, सुटका केलेल्या महिलांपैकी एका तरुणीची भाषा आणि देहबोली पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, तिने सुरुवातीला स्वतःला भारतीय असल्याचे भासवून बनावट आधार कार्ड सादर केले. मात्र, पोलिसांच्या तांत्रिक तपासणीत आणि बायोमेट्रिक पडताळणीत तिचे आधार कार्ड बनावट असल्याचे सिद्ध झाले. अखेर तिने आपण बांगलादेशातील खुलना येथील रहिवासी असल्याची कबुली दिली.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध सुरू

एका सामान्य कुंटणखान्याच्या छाप्यामध्ये बांगलादेशी तरुणी आढळल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ही तरुणी सीमा ओलांडून भारतात कशी पोहोचली? तिला जळगावात कोणी आणले? तसेच, तिला महाराष्ट्रात बनावट भारतीय कागदपत्रे आणि आधार कार्ड बनवून देणारी टोळी कोणती? या गंभीर प्रश्नांचा शोध आता पोलीस घेत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि बनावट दस्तऐवज बनवणाऱ्या रॅकेटपर्यंत जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असून, जळगाव पोलिसांची पुढील तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT