जळगाव : शहरातील प्रतिष्ठित 'रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स'मध्ये ग्राहकाच्या वेशात येऊन हातसफाई करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेलंगणात जाऊन मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या भामट्याने चोरलेल्या सोन्याच्या साखळीची चक्क 'लगड' बनवली होती. मात्र, जळगाव पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. या कारवाईत पोलिसांनी १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सुभाष चौकातील नामांकित 'रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स' (नयनतारा अँड सन्स) येथे दिनांक ०९ जानेवारी २०२६ रोजी एक अज्ञात तरुण ग्राहक म्हणून आला होता. सेल्समनला बोलण्यात गुंतवून त्याने १९.३५० ग्रॅम वजनाची आणि सुमारे २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची सोन्याची साखळी लंपास केली. याप्रकरणी शनिवारी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भरवस्तीत आणि प्रतिष्ठित दुकानात झालेल्या या चोरीमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.
असा लागला छडा: जळगाव ते तेलंगणा!
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपीचे लोकेशन थेट तेलंगणा राज्यातील सायबरबाद परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. एलसीबीच्या पथकाने क्षणाचाही विलंब न करता तेलंगणा गाठले आणि भास्कर किसन बानोथ (वय २२, रा. नगाई पल्ली तांडा, जि. यदाद्री भुवनागिरी, तेलंगणा) याला शिताफीने ताब्यात घेतले.
साखळीची केली 'लगड'
पोलिसांनी खाक्या दाखवताच भास्कर बानोथ याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीचा माल विकताना किंवा स्वतःकडे बाळगताना ओळख पटू नये, यासाठी त्याने हुशारी लढवत सोन्याची साखळी वितळवून त्याची 'लगड' बनवली होती. मात्र, त्याची ही चलाखी कामाला आली नाही. पोलिसांनी त्याच्याकडून ती लगड हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउनि जितेंद्र वल्टे, हवालदार प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सिद्धेश्वर डापकर आणि महेश सोमवंशी यांनी केली. पुढील तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.