Jalgaon Crime  
जळगाव

Jalgaon Crime | ४० दिवसांनंतर LCB कडून गुन्ह्याचा छडा, दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीचा खून; भाचा अटकेत

४० दिवसांच्या तपासानंतर LCB कडून गुन्ह्याचा छडा; कानळदा फाट्याजवळील सिमेंटच्या चारीत मृतदेह आढळला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : पारोळा तालुक्यातील करंजी बु. येथे एकटी राहणाऱ्या ८५ वर्षीय वृद्ध महिलेच्या बेपत्ता होण्याचे गूढ अखेर ४० दिवसांनी उकलले आहे. सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी सख्ख्या भाच्यानेच मावशीचे अपहरण करून तिचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. प्रशांत उत्तम माळी (वय ४०, रा. मुकटी, ता. जि. धुळे) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या जबाबानंतर पोलिसांनी जळगाव शहरालगत कानळदा फाट्याजवळील सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या चारीतून वैजंताबाई गणपत माळी यांचा मृतदेह हस्तगत केला.

वैजंताबाई माळी या ३ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे चुलत पुतणे भैय्यासाहेब हिरामण रोकडे यांच्या खबरीवरून ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. वृद्ध महिलेच्या अंगावर मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने असल्याने त्यांच्या बेपत्ता होण्यामागे घातपाताचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.

एलसीबी चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली. एका पथकाने संशयित आरोपीचा शोध घेतला, तर दुसऱ्या पथकाने बेपत्ता महिलेचा शोध सुरू ठेवला. पारोळा, करंजी, अमळनेर, धरणगाव, धुळे, मुक्ताईनगर, यावल ते जळगाव अशा विस्तृत परिसरात तपास करण्यात आला. सुमारे २५० किलोमीटरच्या परिसरात शोधमोहीम राबविताना तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेज तपासताना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.१६ वाजता वैजंताबाई यांच्या अंगणात प्रशांत माळी त्यांच्याशी बोलताना दिसून आला. त्यानंतर काही वेळाने वैजंताबाई पांढऱ्या रंगाच्या मारुती स्विफ्ट डिझायर कारमधून जाताना दिसल्या. तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजमधील बाबींमुळे प्रशांत माळी याच्यावरील संशय बळावला. तब्बल ४० दिवसांच्या तपासानंतर एलसीबी पथकाने प्रशांत माळी याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या प्रशांतने अखेर गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘नातेवाईकाचा मृत्यू झाला’ असे सांगून मावशीला नेले

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांतवर मोठे कर्ज होते. त्याने यापूर्वी मावशीकडून पैसे घेतले होते. मात्र, तिने आणखी पैसे देण्यास नकार दिल्याने आणि तिच्या अंगावरील दागिन्यांवर त्याची नजर असल्याने त्याने हा कट रचला. ३ ऑगस्ट रोजी सकाळी त्याने ‘शिरसोली येथे नातेवाईकाचा मृत्यू झाला असून तेथे जायचे आहे,’ असे सांगून वैजंताबाई यांना भाड्याच्या एम एच 19 बी जे 0071 क्रमांकाच्या कारमध्ये बसवले. त्यानंतर धरणगाव, अमळनेर आणि धुळे परिसरात त्याने दिवसभर त्यांना कारमधून फिरवले. या दरम्यान दागिने देण्याची मागणी केली; मात्र वैजंताबाईंनी त्यास विरोध केला.

पोलिसांच्या तपासानुसार, ४ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे १.३० वाजता धुळे येथील नंदाळे फाट्याजवळ महामार्गावर कार थांबवून प्रशांतने रुमालाच्या सहाय्याने गळा आवळून वैजंताबाईंचा खून केला. त्यानंतर मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवून तो घरी गेला. त्याच दिवशी संध्याकाळी जळगावजवळील कानळदा फाट्याच्या परिसरात सर्व्हिस रोडलगत असलेल्या सिमेंटच्या चारीत मृतदेह टाकून दागिने घेऊन पसार झाल्याचे तपासात समोर आले.

काही दागिने सोनारांना विकले

आरोपीने काही दागिने धरणगाव, अमळनेर आणि धुळे येथील सोनारांना विकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. तर उर्वरित दागिने फागणे (धुळे) परिसरात लपविल्याचे त्याने सांगितले आहे. चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.

या प्रकरणी सुरुवातीला भैय्यासाहेब रोकडे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलिस ठाण्यात गु.र.नं. ३२२/२०२६ अन्वये BNS कलम १३७(२) आणि १४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खुनाचा तसेच पुरावा नष्ट करण्यासंदर्भातील कलमांची वाढ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी व पारोळा पोलिसांच्या संयुक्त पथकाने केली. पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT