जळगाव : मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यातील अधिकारी असल्याचे भासवून भुसावळमधील ८६ वर्षीय सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल ८० लाख ५ हजार रुपयांनी ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुरुवारी (दि.11) रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
फसवणुकीचे बळी ठरलेले सुकदेव पांडुरंग चौधरी हे एमएसईबीमधून सेवानिवृत्त आहेत. २८ ऑक्टोबर ते ५ डिसेंबर या कालावधीत ही फसवणूक टप्प्याटप्प्याने झाली. संशयितांनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून पोलीस अधिकारी म्हणून ओळख दिली. त्यांनी चौधरी यांच्यावर मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात मनी लाँडरिंग आणि अतिरेक्यांकडून पैसे घेतल्याचे गुन्हे दाखल असल्याचे खोटे सांगितले. गुन्हा दाखल झाल्याची कल्पना देण्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे आणि काही फोटोही पाठवले. अटक वॉरंट निघाल्याचा खोटा दावा करत सतत धमक्या दिल्या. या दबावाला घाबरून चौधरी यांनी संशयितांनी दिलेल्या विविध बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे एकूण ८० लाख ५ हजार ४१६ रुपये भरले. चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.