Crime News  Pudhari
जळगाव

Jalgaon crime | पोटगीचा 'सूड' अन् सुपारीबाज पतीचा 'खेळ' खल्लास! नगरदेवळा जाळपोळ प्रकरणाचा जळगाव एलसीबीकडून पर्दाफाश

२ लाखांची सुपारी देऊन लावली होती बायकोच्या घराला आग; ९ चोरीच्या मोटारसायकलींसह आरोपींच्या आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : न्यायालयाने दिलेल्या २० हजार रुपयांच्या पोटगीचा राग मनात धरून, स्वतःच्याच पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या नराधम पतीचा कट जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) उधळून लावला आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे घडलेल्या या खळबळजनक जाळपोळ प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी मुख्य सूत्रधार पतीसह त्याच्या साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, या तपासादरम्यान ९ चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात एलसीबीला यश आले आहे.

नगरदेवळा येथील फिर्यादी किरण उमेश राऊळ आणि त्यांचे पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) यांच्यात गेल्या काही काळापासून न्यायालयात वाद सुरू आहे. न्यायालयाने राहुल पाटील याला दरमहा २० हजार रुपये पोटगी (खावटी) देण्याचे आदेश दिले होते. दरमहा खिशातून जाणारे पैसे आणि पत्नीवरील राग यामुळे राहुलने तिचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी त्याने गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला २ लाख रुपयांची सुपारी दिली आणि १ लाख रुपये आगाऊ (ॲडव्हान्स) दिले.

ठरलेल्या कटानुसार, आरोपी गणेश पाटील आणि समाधान निकम यांनी मध्यरात्री किरण राऊळ यांच्या घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली. घरात फिर्यादी आणि त्यांची आई झोपलेल्या असताना हा भीषण प्रकार घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

एलसीबीचा 'थर्ड आय' अन् 'गुप्तेश्वर' कामाला

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एलसीबीला समांतर तपासाचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे गणेश पाटील याला ताब्यात घेतले. त्याने पोपटासारखी सर्व हकिकत सांगितली आणि या संपूर्ण कटाचा सूत्रधार राहुल पाटील असल्याचे उघड झाले.

जाळपोळीच्या तपासात निघाला 'गाड्यांचा चोर'

मुख्य आरोपी गणेश पाटील याच्याकडे अधिक चौकशी केली असता, तो केवळ सुपारीबाज नसून सराईत दुचाकी चोर असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून जळगाव, जालना, संभाजीनगर आणि थेट गुजरात राज्यातील सुरत येथून चोरलेल्या तब्बल ९ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे प्रमुख राहुल गायकवाड, पीएसआय शेखर डोमाळे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, हेमंत पाटील, रतन गिते, जितू पाटील, ईश्वर पाटील, राहुल महाजन, सचिन घुगे, बाबासाहेब पाटील, दिनेश पाटील आणि सायबर सेलचे मिलिंद जाधव यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT