जळगाव

Jalgaon Crime : अपघाताने उघड केला 'गुटख्या'चा काळाबाजार!

वडगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरला कारची धडक अन् गुपित फुटले; संभाजीनगरचे दोघे जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : अपघात झाला आणि काळ्या धंद्याचा बुरखा थेट रस्त्यावरच फाटला! रावेर तालुक्यातील वडगाव फाट्याजवळ ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक देणाऱ्या कारमधून तब्बल पावणेआठ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निंभोरा पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवत छत्रपती संभाजीनगरच्या दोन तस्करांना बेड्या ठोकल्या असून, कारसह ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेसहाच्या सुमारास निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव फाट्याजवळ हुंदाई आय-१० कारने क्रमांक एम एच -२६ व्हि ४४२३ रस्त्यावरील सोनालिका ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख व पोलीस उपनिरीक्षक अभय ढाकणे यांनी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. मात्र, पोलिसांची नजर कारमध्ये संशयास्पदरीत्या ठेवलेल्या पोत्यांवर पडली आणि पोलिसांचा संशय बळावला.

ठाण्यात गाडीची तपासणी अन् 'सुगंध' पसरला!

रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून पोलिसांनी अपघातग्रस्त कार आणि चालकासह दोघांना थेट पोलीस ठाण्यात आणले. पंचांसमक्ष गाडीची कसून झडती घेतली असता, कारमध्ये राजरोसपणे कोंबून भरलेला ५ लाख ९० हजार ४४० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा मिळून आला. पोलिसांनी १ लाख ८० हजारांची कार आणि गुटखा असा एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपी अजीम तैय्यब सय्यद (वय २३, रा. गारखेडा परिसर, क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर) आणि शेख मुद्दस्सिर कासिम (वय २३, रा. आलमगीर मशीदजवळ, गारखेडा, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. निंभोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुटखा नेमका कुठून भरण्यात आला आणि खान्देशात कोणाला पोहचवला जाणार होता? या रॅकेटमागे छत्रपती संभाजीनगर की जळगाव जिल्ह्यातील बडा माफिया आहे? याचा कसून शोध पोलीस घेत आहेत.

ही धडक कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मीरा देशमुख, उपनिरीक्षक अभय ढाकणे, पोलीस अंमलदार सतीश सानप, किरण जाधव, महेंद्र महाजन, परेश सोनवणे, प्रशांत चौधरी, अमोल वाघ आणि सफराज तडवी यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT