Death Pudhari
जळगाव

Jalgaon crime report : जिल्ह्यात 6 महिन्यांत ४४३ जणांनी जीवन संपवले; दररोज सरासरी २ ते ३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात सर्वाधिक जीवन संपवल्याच्या घटना एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत (३१) झाल्या आहेत

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात १ जानेवारी २०२६ ते ३० जून २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ४४३ जणांनी जीवन संपवल्याची नोंद झालीआहे. जिल्ह्यात दररोज सरासरी २ ते ३ जणांनी जीवन संपल्याचे जिल्हा पोलिसांच्या विश्लेषणातून समोर आले आहे. जीवन संपवल्यामध्ये प्रौढ पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक असून दारूचे व्यसन, नैराश्य, कौटुंबिक तणाव आणि कर्जबाजारीपणा ही प्रमुख कारणे असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

पोलिसांच्या आकडेवारीनुसार एकूण ४४३ जीवन संपवल्यांपैकी ३८३ प्रौढ पुरुष, २९ प्रौढ महिला, ८ अल्पवयीन मुलं आणि ११ अल्पवयीन मुली आहेत. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केवळ १२ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

पोलिस ठाणेनिहाय चित्र

जिल्ह्यात सर्वाधिक जीवन संपवल्याच्या घटना एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत (३१) झाल्या आहेत. त्यापाठोपाठ पारोळा (२८), अमळनेर (२३), जळगाव तालुका (२२), भडगाव (२१), मेहुणबारे (१९), पहूर (१८) आणि रामानंद नगर (१८) या पोलिस ठाण्यांचा क्रमांक लागतो. तर सर्वात कमी जीवन संपवल्याच्या घटना सावदा (१), जिल्हापेठ (२), शनिपेठ (५), निंभोरा (६) आणि फत्तेपूर (६) या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नोंदविण्यात आल्या.

कारणांचे विश्लेषण

प्रौढ पुरुषांमध्ये दारूचे व्यसन (९०) हे सर्वात मोठे कारण ठरले असून त्यानंतर नैराश्य (७४), कौटुंबिक कारणे (६१), कर्जबाजारीपणा (५२), आजार (४४), लग्न न जमणे (२९), प्रेमप्रकरण (७), मानसिक आजार (६) आणि परीक्षेचा ताण (४) ही कारणे आढळून आली. प्रौढ महिलांमध्ये कौटुंबिक कारणे (११) आणि नैराश्य (१०) ही प्रमुख कारणे असून, आजाराला कंटाळून (५), मानसिक आजार (२) आणि प्रेमप्रकरण (१) अशी इतर कारणे नोंदविण्यात आली आहेत. अल्पवयीन मुलांमध्ये नैराश्य (३) आणि कौटुंबिक कारणे (२) ही प्रमुख कारणे असून, शिक्षणाचा ताण, प्रेमप्रकरण आणि व्यसन यामुळे प्रत्येकी एका मुलाने जीवन संपवल्याची नोंद आहे. अल्पवयीन मुलींमध्ये कौटुंबिक कारणे (४) आणि परीक्षेचा ताण (४) ही प्रमुख कारणे असून, प्रेमप्रकरणामुळे ३ जणांनी जीवन संपवल्याची नोंद झाली आहे.

चिंताजनक वास्तव

सहा महिन्यांत झालेल्या ४४३ जीवन संपवल्याच्या घटनांमुळे जिल्ह्यात दरमहा सरासरी ७४ आणि दररोज सरासरी २.४६ जण जीवन संपवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, कौटुंबिक समुपदेशन आणि कर्जबाजारीपणावरील उपाययोजनांना अधिक गती देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः एमआयडीसी, पारोळा, अमळनेर, जळगाव तालुका आणि भडगाव या भागांमध्ये जीवन संपवणे घटना प्रतिबंधासाठी लक्ष्यित जनजागृती, समुपदेशन आणि प्रतिबंधात्मक उपक्रम राबविण्याची आवश्यकता पोलिसांच्या विश्लेषणातून समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT