Life Imprisonment Pudhari
जळगाव

Jalgaon crime news | ११ वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार अन् हत्या प्रकरणी नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

अमळनेर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : चोपडा शहरात अवघ्या ११ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार तिची निर्घृण हत्या करणाऱ्या २२ वर्षीय आरोपीला अखेर शिक्षा मिळाली आहे. अमळनेर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी. व्ही. पाटील यांनी आरोपीला जन्मठेप आणि ३० हजाराचा रुपये दंडाची ऐतिहासिक शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास त्याला अतिरिक्त १ वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. अत्यंत जलद गतीने चाललेल्या या खटल्यात 'खाकी'ची तत्परता, सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि वैज्ञानिक पुरावे शिक्षा देण्यात यशस्वी ठरले आहेत.

चोपड्यात घडलेल्या या मन सुन्न करणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण जळगाव जिल्हा संतापाने पेटून उठला होता. अत्यंत कौशल्याने आणि वेगाने तपास चक्र फिरवले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच म्हणजेच ६ नोव्हेंबर २०२४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर १ मार्च २०२५ रोजी दोषारोप निश्चिती करण्यात आली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सादर केलेले तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे या खटल्यात अत्यंत कळीचे ठरले.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील . के. आर. बागुल यांनी पीडित कुटुंबाची बाजू अत्यंत भक्कमपणे मांडली. त्यांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि घेतलेली उलटतपासणी मध्ये आरोपीच्या सर्व मार्ग बंद झाले. 'अशा नराधमांना समाजात कोणतेही स्थान असू नये आणि भविष्यात अशा गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही, असा धाक निर्माण करणारीच शिक्षा दिली जावी,' हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. न्यायालयाने आरोपीचा गुन्हा सिद्ध मानण्यासाठी गुन्हा घडण्याच्या काही वेळ आधी पीडित चिमुरडी ही शेवटची आरोपीसोबत (जो तिचा शेजारी होता) दिसली होती, हा सर्वात मोठा दुवा ठरला. तपासामध्ये आणि प्रत्यक्ष न्यायालयासमोर बाल साक्षीदारांनी आरोपीला तंतोतंत आणि बिनचूक ओळखले. त्यांच्या साक्षीने आरोपीच्या बचावाची तटबंदी ढासळली.

फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेच्या अहवालाने आणि डीएनए चाचणीने आरोपीचा गुन्ह्याच्या ठिकाणाशी आणि थेट पीडितेशी असलेला संबंध शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केला.तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून मिळालेले रक्ताचे डाग आणि इतर भौतिक पुरावे हे पीडितेच्या रक्ताशी जुळले. पीडितेवर लैंगिक अत्याचार करून, तिला गंभीर जखमा करून तिचा गळा आवळून खून केल्याची स्पष्ट पुष्टी शवविच्छेदन अहवालाने केली. अमळनेर न्यायालयाच्या या निकालामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी आणि पीडितेच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, "न्याय उशिरा का होईना, पण नराधमाला योग्य शिक्षा मिळाली," अशी प्रतिक्रिया उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT