जळगाव : कापसाचे दर हे जागतिक घडामोडींवर अवलंबून असतात. देशात ३० टक्के कापूस वापरला जातो, तर उर्वरित ७० टक्के कापूस निर्यात होतो. बाह्य देशांतून मागणी वाढली, तर भाव वाढतो; मात्र आयात वाढल्यास दर घसरत असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
जिल्हा नियोजन भवन येथे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि समस्या यावर चर्चा करण्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिक, प्रशासन आणि मंत्री सावकारे यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
बारावीचा निकाल लागलेला असून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करून यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नव्याने निर्माण झालेल्या शैक्षणिक संधी व प्रशिक्षणाचा उपयोग करून घ्यावा, असे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करताना ते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या योजना आणि मिळणाऱ्या लाभांबाबत विचारले असता, "लाडक्या बहिणी जे मिळत आहे त्यामध्ये बहीणी खुश आहेत," असेही मंत्री सावकारे यांनी सांगितले. शासन २१०० रुपयांच्या योजनेबाबत चाचपणी करत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
कापसाच्या गुणवत्तेवर भर देत मंत्री म्हणाले की, विदर्भातील कापूस चांगल्या दर्जाचा असतो, त्यामुळे त्याला मागणी असते. उत्तर महाराष्ट्रातील कापसाची गुणवत्ता तुलनेत कमी असल्याने त्याला कमी भाव मिळतो. चांगल्या प्रतीचे बियाणे आणि खत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार पावले उचलत आहे.
रिटेल विक्रेत्यांच्या बैठकीतही मंत्री सावकारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे बियाणे, खत आणि उत्पादन वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाचा लाभ दिला पाहिजे. काही कंपन्या अशा बियाण्यांची निर्मिती करून त्याचा नफा स्वतः घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी सजग राहण्याची गरज आहे, असेही त्यांनी रिटेल विक्रेत्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले.