जळगाव

Jalgaon Corruption Case : लाचखोर उपअभियंत्याची सव्वापाच कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड!

घरात लाखोंची रोकड, बँक लॉकरमध्ये अडीच किलो सोने; जळगाव जिल्हा परिषदेचे सतीश शिसोदे एसीबीच्या जाळ्यात

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी (वर्ग-१) सतीश मन्सुलाल शिसोदे यांच्या मालमत्तेचा मोठा पर्दाफाश झाला आहे. एसीबीच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानासह बँक लॉकरची झडती घेतली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता उघडकीस आली आहे. यामध्ये अडीच किलोहून अधिक सोने, साडेअकरा किलो चांदी, प्लॅटिनमचे दागिने, लाखोंची रोकड, दोन घरे आणि महागड्या वस्तूंचा समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

लाच घेताना रंगेहात पकडले; ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

उपअभियंता सतीश शिसोदे (वय ५५, रा. स्वामी विवेकानंद सोसायटी, आदर्श नगर, जळगाव) यांना २ नोव्हेंबर रोजी लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्यांच्या मालमत्तेची तपासणी केली असता कोट्यवधींची संपत्ती समोर आली.

घरझडतीत १ कोटी ४१ लाखांचा मुद्देमाल

पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या पथकाने शिसोदे यांच्या आदर्शनगर येथील निवासस्थानी झडती घेतली. या वेळी घरातून ७ लाख ९७ हजार ९२० रुपयांची रोकड आढळून आली. याशिवाय आदर्श नगरातील ४५ लाख रुपये किमतीचे घर क्रमांक १ आणि ६५ लाख रुपये किमतीचे घर क्रमांक २, तसेच २४ लाख ३९ रुपयांच्या महागड्या वस्तूंचा समावेश आहे. या घरझडतीत एकूण १ कोटी ४१ लाख ९७ हजार ९५९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला.

बँक लॉकरमध्ये अडीच किलो सोने, साडेअकरा किलो चांदी

उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या पथकाने शिसोदे यांच्या बँक लॉकरची तपासणी केली. या वेळी मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि प्लॅटिनमचे दागिने आढळून आले.

सोने : २ हजार ५२४.१८ ग्रॅम (अडीच किलोहून अधिक) सोने, सोन्याची बिस्किटे, पट्ट्या, चेन, पेंडल आणि बांगड्या. किंमत ३ कोटी ५१ लाख ८१ हजार १५३ रुपये.

चांदी : ११ हजार ६३३ ग्रॅम (साडेअकरा किलो) चांदी, भांडी, बिस्किटे आणि लगडी. किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये.

प्लॅटिनम : १०१.०२ ग्रॅम वजनाचे दागिने. किंमत ३ लाख ५५ हजार २८६ रुपये.

बँक लॉकरमधून एकूण ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपयांचे दागिने व मौल्यवान धातू हस्तगत करण्यात आले आहेत.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, स्मिता नवघरे तसेच अंमलदार सुरेश पाटील, किशोर महाजन, संगीता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे, सुनील वानखेडे आणि मनोज पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

लाचेची मागणी झाल्यास एसीबीशी संपर्क साधा

शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT