Illegal Cattle Transport Chopda Jalgaon
जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करून त्यांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नांगलवाडी गावाजवळील महादेव मंदिर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावरून १० गोवंशांना अमानुष पद्धतीने पायी हाकत नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. संबंधित आरोपींनी गुरांना बांधून ठेवत त्यांना चारा-पाण्याविना कत्तलीच्या उद्देशाने नेल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी सुमारे ४ लाख २० हजार रुपये किंमतीची १० गुरे जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या जनावरांमध्ये गावठी व गीर जातीचे विविध वयोगटातील बैल, गोरे तसेच एका वासराचा समावेश आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मदन रतीलाल पावरा यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच महाराष्ट्र पशूसंरक्षण अधिनियम १९७६ अंतर्गत विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पुंडलिक कोळी करीत आहेत.