जळगाव : नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये 372 नामनिर्देशन पत्र भरण्यात आली असून 258 उमेदवारांची संख्या आहे. यात आघाडी व महायुती मधील नेत्यांनी केलेल्या बंडखोरीमुळे उमेदवारांची डोकेदुखी वाढली असून ही डोकेदुखी चार तारखेच्या सूर्योदयाची वाट पाहत आहे. तर युतीचे संकट मोचक यांच्यावर भाजपाच्या उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीमुळे संकट निवारण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे. त्यामुळे इच्छुकांचे हे बंड थोपविण्यात ते कितपत यशस्वी होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कधीकाळी जळगाव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या बालेकिल्लांमध्ये भाजपा व शिवसेना यांनी सुरुंग लावून संपूर्ण विधानसभेच्या 11 जागांपैकी अकरा जागांवर आपला शिक्का उठविला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये युती विरुद्ध आघाडी असा जरी सामना असला तरी यामध्ये बहुजन समाज पार्टी वंचित यांनी आव्हान दिलेले आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये होणारी थेट निवडणूक न होता प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये तीन ते चार पक्ष किंवा त्यापेक्षा जास्त पक्ष मैदानात उतरलेले आहे. त्यात अपक्षांची भर तर सर्वात मोठी आहे. दि. 29 विधानसभा क्षेत्रातील नामनिर्देशन भरण्याच्या शेवटच्या दिवशी इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात अकराचे अकरा विधानसभा क्षेत्रांमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल केले. 29 तारखेपर्यंत 258 उमेदवारांनी 372 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे.
तर यामध्ये काही ठिकाणी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे राज्याचे संकटमोचक व जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरुवात जळगाव पासून म्हणजे जळगाव शहर विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाचे अश्विन सोनवणे, माजी नगरसेवक मयूर कापसे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. अमळनेर मध्ये युतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवाराविरुद्ध गेल्या वेळेस पराभूत झालेले भाजपचे व आताच्या पक्ष उमेदवार श्री चौधरी यांनी बंड पुकारले आहे. तर एरंडोल युतीचे शिवसेना गटाचे उमेदवाराविरुद्ध अजित राजेंद्र पाटील व भाजपाचे माजी खासदार एटी नाना पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. तर पाचोरा या ठिकाणी शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार विरुद्ध भाजपाचे अमोल शिंदे प्रताप हरी पाटील, माजी आमदार दिलीप ओंकार वाघ यांनी बंड केले आहे. यामुळे गिरीश महाजन यांची भूमिका या बंडामध्ये काय राहील हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
गिरीश महाजन हे बंड किती प्रमाणात थोपविण्यात यशस्वी होतात त्यावर सर्व समीकरणे अवलंबून आहे. चार तारखेला माघारीची तारीख असल्याने या तारखेकडेसर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यानंतर प्रत्येक विधानसभा क्षेत्राचे लढत व उमेदवार यामध्ये स्पष्टता येणार आहे. त्यामुळे या पाच ते सहा दिवसांमध्ये काय चित्र होणार व मतदार संघामध्ये काय बदल होणार यावर सर्व खेळी अवलंबून आहे. त्यामुळे जिल्ह्याचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.