जळगाव: चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक गावातून शाळेतून घरी परतत असताना रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे हिचा मृतदेह तब्बल चार दिवसांनंतर गावालगतच्या एका विहिरीत आढळून आला. सुमारे ६० ते ७० तास चाललेल्या शोधमोहिमेचा शेवट अत्यंत दुर्दैवी ठरला असून संपूर्ण तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडाले आहे.
धनश्री शिंदे ही गावातील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तातडीने तिचा शोध सुरू केला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी ४ वाजून ५५ मिनिटांनी ती ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूने जाताना दिसून आली होती. मात्र त्यानंतर तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, शोधादरम्यान गावाबाहेरील शेतरस्त्यावर धनश्रीचे शालेय दप्तर आढळून आले. त्यामुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी अपहरणाचा तीव्र संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अपहरणाचा संशय अधिक बळावत असतानाच सोमवारी (दि.15) रोजी गावालगतच्या शिवारातील एका विहिरीत धनश्रीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया तत्काळ राबवण्यात आली. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हा अपघात आहे की घातपात, तसेच अपहरणानंतर तिला विहिरीत फेकण्यात आले का, या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. या घटनेमुळे धनश्रीच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनावर झाला असून गावात नि:शब्द शोककळा पसरली आहे.