Unmesh Patil on Jalgaon Chalisgaon Case
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील बिलाखेड येथील एका महिलेवरील कथित अत्याचार, महिला पोलीस कर्मचाऱ्याला न्याय मिळण्यात होत असलेला विलंब तसेच काही तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप या पार्श्वभूमीवर माजी खासदार उन्मेश पाटील यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत प्रशासनावर गंभीर आरोप केले.
त्यांनी सांगितले की, पीडित महिला आणि संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या असूनही तब्बल वर्षभर उलटूनही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी उन्मेश पाटील यांनी आरोप केला की, चाळीसगावचे आमदार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या संगनमताने कोट्यवधी रुपयांचे कथित अवैध उत्खनन सुरू असून, त्याविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य केले जात आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने कारवाई न केल्यास सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
पाटील यांनी असा सवाल उपस्थित केला की, पीडित महिलेने पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करूनही अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही. "एका प्रकरणात लेखी तक्रार नसतानाही कारवाई झाली, तर येथे तक्रार असूनही १२ महिन्यांपासून विलंब का होत आहे?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पत्रकार परिषदेत काही पीडित तरुणांनाही उपस्थित करण्यात आले. खदानींविरोधात भूमिका घेतल्यामुळे एका तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्याचा हात रॉडने तोडण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला. याशिवाय, पीडितांवरच खोटे गुन्हे दाखल करून पोलीस यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
महिलांवरील अत्याचार आणि तरुणांवरील कथित अन्याय सहन केला जाणार नसल्याचे सांगत, जळगाव पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास हे प्रकरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहविभागापर्यंत नेले जाईल, असा इशारा माजी खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.