जळगाव : जिल्ह्यातील चाळीसगाव येथील 14 पर्यटक तीन दिवस पहलगाम परिसरातील निसर्गाचा आस्वाद घेतल्यानंतर सोमवारी तेथून ते श्रीनगरला रवाना झाल्याने या हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पहलगामहून निघण्यास अजून एक दिवस उशीर केला असता तर... या कल्पनेने सर्व जण हादरले. केवळ नशिबाने आपण बचावल्याची भावना या पर्यटकांनी व्यक्त केली आहे.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला असून, असंख्य पर्यटक तेथे अडकून पडलेले आहेत. अडकून पडलेल्यांमध्ये भाजपच्या प्रदेश पदाधिकारी देवयानी ठाकरे यांचाही समावेश आहे. त्यांनी श्रीनगर येथून जळगावच्या खासदार स्मिता वाघ आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधत श्रीनगरहून आम्हाला महाराष्ट्रात परत आणण्यासाठी तातडीने व्यवस्था करण्याची विनंती केली आहे.
पुणे-जम्मूतावी झेलम एक्स्प्रेसने चाळीसगावहून सात महिला आणि सात पुरुषांचा गट जम्मू येथे उतरून शनिवारी पहेलगाम येथे पोहोचला होता. सर्वांनी शनिवार ते सोमवार असे तीन दिवस निसर्गाचा आनंद घेतला आणि सोमवारी दुपारी ते श्रीनगरला रवाना झाले. मंगळवारी दुसऱ्याच दिवशी पहेलगामध्ये हल्ला झाल्याचे वृत्त कळताच या चौदा जणांना धक्का बसला. पहलगामहून पुढील प्रवासाला आम्ही निघाल्याने थोडक्यात बचावलो, असे देवयानी ठाकरे यांनी सांगितले.
सध्या हा गट श्रीनगरला एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. तेथून कटरा आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन २७ एप्रिलला दिल्लीहून विमानाने मुंबईकडे परतीच्या प्रवासाला ते निघणार होते. परंतु आता हा गट श्रीनगरमध्ये अडकून पडलेला आहे. गटात सर्वच सदस्य ज्येष्ठ नागरिक असून, ते प्रचंड तणावात आहेत.
हल्ला झाला त्यावेळी जळगावच्या रेखा वाघुळदे, रेणुका भोगे, अनिता चौधरी या तिघी जणी पहेलगाम येथेच होत्या. त्यांना लष्कराने तातडीने सुरक्षितस्थळी हलविल्याने त्या हल्ल्यातून बचावल्या.
चाळीसगाव तालुक्यातील 14 पर्यटक व रावेर तालुक्यातील तीन पर्यटकांशी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व रावेर तालुक्याचे आमदार अमोल जावळे यांनी संपर्क साधत धीर दिला आहे. चाळीसगाव तालुक्यातील पर्यटक देशमुख यात्रा कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेलेले आहेत. अडकलेल्या सर्व पर्यटकांना येत्या 1 ते 2 दिवसांत सुखरूपपणे घरी पोहोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे माझा पाठपुरावा सुरू असून, शासनदेखील यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असल्याचे सांगत त्यांनी सर्वांना धीर दिला. गरज पडली तर मी स्वतः तिथे येईल. तसेच मी त्यांचे तिकीट काढून विमानाने घरी आणेल. पण कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. आमदार मंगेश चव्हाण यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधला व त्यांना लवकरात लवकर परत आणण्याची विनंती केली.मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव