Jewelry Thief Arrested
जळगाव : जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोन्याची पोत आणि चैन लंपास करणार्या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने जेरबंद केले. सागर दादासाहेब जाधव (वय ३१, रा. खर्डे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन चोरीच्या गुन्ह्यांतील २७ ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचे, हस्तगत करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पथक विविध बसस्थानकांवर गस्त घालत होते.
१२ सप्टेंबर रोजी एलसीबीचे पथक जळगाव शहरातील मुख्य बसस्थानक परिसरात गस्त घालत असताना सागर जाधव हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्या बॅगेत सोन्याचे दागिने आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, सुमारे महिनाभरापूर्वी मुक्ताईनगर बसस्थानकावर एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची पोत, सुमारे १५ दिवसांपूर्वी एरंडोल बसस्थानकावर एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि १० ते १२ दिवसांपूर्वी जामनेर बसस्थानकावर दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती चोरी केल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.
एलसीबीच्या पथकाने संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून माहितीची पडताळणी केली. त्यानंतर मुक्ताईनगर, एरंडोल आणि जामनेर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याचे समोर आले.
आरोपीकडून मिळालेल्या दागिन्यांचे वर्णन संबंधित गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेल्या दागिन्यांशी जुळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. २७ ग्रॅम वजनाचे आणि ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करून ते एरंडोल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव), अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव), उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, बापू रोहोम आणि नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पुढील तपास एरंडोल पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.