जळगाव

Jalgaon News| जळगाव बसस्थानकावरील 'हातचलाखी' भोवली; एलसीबीची धडाकेबाज कारवाई

पाचोऱ्यातून दोन आरोपी जेरबंद, एक अद्याप फरार

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : बसस्थानक परिसरात 'हातचलाखी' करून आणि शनिदोषाची भीती दाखवून वृद्ध नागरिकांना लुटणाऱ्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. साध्या दगडाचा 'रुद्राक्ष' बनवण्याचे नाटक करून एका ६५ वर्षीय वृद्धाची अंगठी आणि रोख रक्कम लांबवणाऱ्या दोन भामट्यांना पोलिसांनी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून बेड्या ठोकल्या आहेत.

जिल्हा बँक कॉलनीतील रहिवासी गजानन विठोबा सर्जेराव (वय ६५) हे २० एप्रिल रोजी दुपारी जळगाव बसस्थानकावर असताना, एका अज्ञाताने त्यांना शेगावच्या बस बद्दल विचारत बोलण्यात गुंतवले. त्याचवेळी दुसऱ्या साथीदाराने एका दगडाचा रुद्राक्ष केल्याचे नाटक करत 'तुमच्यावर मोठा शनिदोष आहे' अशी भीती घातली. श्रद्धेचा गैरफायदा घेत या भामट्यांनी वृद्धाला बसस्थानकाच्या कोपऱ्यात नेले आणि 'दोष निवारण' करण्याच्या नावाखाली त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि खिशातील पैसे काढून पोबारा केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समांतर तपासाचे आदेश दिले होते. एलसीबीच्या पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हे संशयित पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे लपून बसले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने नगरदेवळा येथून अल्ताफ हसन मदारी (वय ३२, रा. नगरदेवळा) आणि मोहसीन जब्बार मदारी (वय ३१, रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात त्यांचा तिसरा साथीदार सद्दाम मदारी हा देखील सामील असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अतुल वंजारी, विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर आणि त्यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. यात पाचोरा पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लाभले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT