जळगाव :सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता आणण्याची आणि गरिबांच्या संस्थांचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर होती, तेच 'वर्ग-१' चे लाचखोर उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी याच्या भुसावळ येथील कॉसमॉस बँकेच्या लॉकरची झडती घेतली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचे घबाड हाती लागले आहे. यात तब्बल ६६० ग्रॅम सोन्याचे बिस्किट व दागिने आणि ८ लाख ३६ हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून, या कारवाईने जळगाव आणि नाशिक परिक्षेत्रातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
'साहेबां'च्या लॉकरमध्ये काय काय निघाले?
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन पंचांसमक्ष कॉसमॉस बँक, भुसावळ येथील लॉकर उघडले असता, सोन्याचे घबाड: एकूण ९९,०४,९६० रुपये किमतीचे तब्बल ६६०.३३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे हार, बांगड्या आणि अस्सल सोन्याची बिस्किटे. ८ लाख ३६ हजार ५०० रुपये रोख रक्कम. विशेष म्हणजे ही सर्व रक्कम ५०० रुपयांच्या कोऱ्याकरकरीत नोटांच्या स्वरूपात होती.
चांदीचे दागिने: २,६२५ रुपये किमतीचे १०.५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने.
एकूण जप्त मालमत्ता: १कोटी ०७ लाख ४४ हजार ०७५ रुपये लोकर मध्ये मिळून आले
जळगाव तालुक्याचे उपनिबंधक (सहकारी संस्था) जगदीश बाबुराव बारी (वय ५६ वर्षे, रा. शांती नगर, यावल रोड, भुसावळ) याला दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच २० मे २०२६ रोजी जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. बारीविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १७०/२०२६, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस कोठडीत असताना आरोपी जगदीश बारी याच्या घराची कसून झडती घेण्यात आली. या घरझडतीदरम्यान तो राहत असलेल्या भुसावळमधील कॉसमॉस बँकेत त्याचे एक लॉकर असल्याची गुप्त माहिती एसीबीच्या हाती लागली. तात्काळ कारवाई करत आज, २२ मे रोजी पंचांसमक्ष हे लॉकर फोडण्यात आले आणि भ्रष्टाचाराचा हा मोठा काळा खजिना उजेडात आला.
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीच्या पथकाने लॉकर झडती पथकात सहभागी अधिकारी व अंमलदार: पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. जळगाव) योगेश ठाकूर ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि स्मिता नवघरे ,पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, महिला पोलीस हवालदार संगीता पवार, पोलीस अंमलदार प्रदीप पोळ, मनोज पाटील, अमोल सूर्यवंशी आणि चंद्रशेखर चौधरी यांनी कामगिरी केली.