जळगाव | विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दोन दिवसापूर्वीच शहरातील शेरा चौकातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाला होता. या प्रकरणात उमेदवारासह दोन्ही मुले व नातेवाईक यांनीच तो गोळीबार सहानुभूती मिळवण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणातील तीन जणांना आधीच अटक करण्यात आलेली आहे. फरार असलेल्या दोघांना पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहर विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शेख अहमद शेख गुलाम हुसेन हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मतदानाच्या दोन दिवस अगोदरच १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता मोटरसायकलवर घेऊन गोळीबार झाला होता. या प्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने प्रकरण हाती घेतल्यानंतर तपासाअंती हा सर्व प्रकार निवडणुकीमध्ये मत मिळवण्यासाठी व सहानुभूती मिळवण्यासाठी झाल्याचे निष्पन्न झाले व या प्रकरणात उमेदवारासह त्याचे दोन्ही मुलं, शालक व त्याचा मित्र हे सहभागी असल्याचे उघड झाले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तीन जणांना आधीच अटक केलेली होती तर मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन दोन्ही रा. मालेगाव हे फरार होते.
हे दोन्ही आरोपी मालेगाव येथे असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी ८ डिसेंबर रोजी मालेगाव येथून फरार झालेल्या संशयित आरोपी मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन दोन्ही राहणार मालेगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या सुचनेनुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार विजयसिंह पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल अक्रम शेख, हरिलाल पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील भरत पाटील यांनी केली आहे.