जळगाव

जळगाव: रशिया येथे नदीत बुडालेल्या अमळनेरच्या भावाबहिणीचे मृतदेह सापडले

अविनाश सुतार

जळगाव; पुढारी वृत्तसेवा: अमळनेर येथील जिशान आणि जिया हे दोघे भाऊबहीण एमबीबीएस च्या शिक्षणासाठी रशिया येथे गेलेले होते. त्यांचा वोल्खोव्हा नदीत बुडून मृत्यू झाला होता. ही घटना मंगळवारी घडली होती. त्यांचे मृतदेह आज (दि.८) सकाळी सापडले. येत्या दोन ते तीन दिवसांत त्यांचे मृतदेह भारतात आणले जातील, अशी माहिती राजदूत कुमार गौरव यांनी दिल्याचे खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले.

रशियातील यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये हे दोघे  वैद्यकीय शाखेत शिकत होते. नदी किनारी फेरफटका मारत असताना लाट येऊन त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आयएफएस) यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती जाणून घेतली होती. तसेच निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करून दिला होता.

प्राथमिक माहितीनुसार, हर्षल अनंतराव देसले (भडगाव), जिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (रा.अमळनेर) हे विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहअध्यायी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी येथील  नदी किनाऱ्याजवळ फेरफटका मारत होते. मंगळवारी (दि.४) फेरफटका मारत असताना ही दुर्घटना घडली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने विदेश मंत्रालयाशी संपर्क करून रशियातील भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क केला होता.

दरम्यान, शवविच्छेदन करून मृतदेह भारतात आणण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण कराव्या लागणार आहेत. यासाठी दोन ते तीन दिवस लागणार असल्याने मंगळवार ते गुरुवार पर्यंत मृतदेह अमळनेरमध्ये येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT