Jamner Sadhana Mahajan Unopposed
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाने पहिल्यांदाच बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची नोंद जामनेरमध्ये केली आहे. जामनेर नगरपरिषदेसाठी भाजपाच्या साधना गिरीश महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
भाजपविरोधात उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आज नगराध्यक्ष पदाचे अर्ज मागे घेतले.
यामध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या प्रतिभा संतोष झाल्टे, राष्ट्रवादी (अजित पवार गट) च्या सरिता ज्ञानेश्वर बोरसे, तसेच काँग्रेसच्या रूपाली पारस ललवाणी यांनी माघार घेतल्यानंतर साधना महाजन यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिक घोषणा अपेक्षित आहे.
या घडामोडीनंतर जामनेर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. जिल्ह्यातील 18 नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये भाजपचा पहिला बिनविरोध लोकनियुक्त नगराध्यक्ष ठरला आहे.
भाजपच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाचे उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवार लोकनियुक्त पदी बिनविरोध निवड झाली. याची अधिकृत घोषणा शुक्रवारी (दि.२१) माघारी नंतर होणार आहे. मात्र, आज जामनेर मध्ये विजयाचा जल्लोष गुलाल उधळून करण्यात आला.