Bhusawal Railway Track Murder Case
जळगाव : भुसावळ येथील रेल्वे लाईनलगत दुर्गम परिसरात आढळलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीच्या हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ शहर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावे किंवा घटनास्थळी ठोस भौतिक पुरावे नसतानाही पोलिसांनी मानवी गुप्त माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे हलवत तिघा आरोपींना अटक केली.
भुसावळ येथील ऑर्डनन्स फॅक्टरीजवळ असलेल्या कालिंका माता मंदिर परिसरातील रेल्वे लाईनशेजारी २८ जूनच्या रात्री संतोष रघुवीर मंचाल (वय ५५) यांचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालात जबडा आणि बरगड्यांवर झालेल्या गंभीर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. कोणत्याही हत्याराचा वापर झाल्याचे आढळून न आल्याने आरोपी शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
याचवेळी, घटनेच्या रात्री एका हळदी समारंभात झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला. त्यामध्ये हर्षल राजू वर्मा हा युवक आक्रमकपणे मारहाण करताना दिसून आला. तो बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर संशय व्यक्त केला.
मानवी गुप्त माहितीच्या आधारे हर्षल वर्मा आणि त्याच्या दोघा साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
तपासात हर्षल राजू वर्मा (वय १९), क्षितिज संजय भालेराव (वय १९) आणि प्रफुल उत्तम जाधव (वय २१) हे रेल्वे परिसरातून लोखंडी स्क्रॅप चोरी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संतोष मंचाल तेथे पोहोचल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि तिघांनी केलेल्या बेदम मारहाणीत संतोष मंचाल यांचा मृत्यू झाल्याची माहिती तपासात समोर आली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, भुसावळ शहर पोलीस आणि बाजारपेठ पोलीस यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.