Bhusawal Police Sub Inspector Absconding
जळगाव : गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्याचा खासगी दलाल सलीम हकीम कुरेशी (रा. बोदवड) यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. कारवाईची माहिती मिळताच पीएसआय सांगळे फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी एसीबीचे पथक प्रयत्नशील आहे. या कारवाईमुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याच्या मित्राचा २८ मार्च रोजी खडका चौफुली परिसरात उधार दिलेल्या पैशांच्या वादातून एका व्यक्तीसोबत किरकोळ वाद व मारहाण झाली होती. या प्रकरणात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्याचा आधार घेत पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे यांनी तक्रारदारास अटक टाळण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. ही मागणी थेट तक्रारदाराच्या पत्नीकडे करण्यात आली होती. कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने ७ एप्रिल रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर एसीबीने पंचांसमक्ष पडताळणी केली असता, सलीम कुरेशी उर्फ "सलीम चाचा" याने, "सांगळे साहेबांसाठी ३० हजार रुपये द्या. अटक न करता केवळ चॅप्टर केस करून सोडून देतो," अशी स्पष्ट मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर तक्रारदाराने पीएसआय राजू सांगळे यांची भेट घेतली असता, त्यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे तपासात समोर आले. मात्र, एसीबीच्या कारवाईचा सुगावा लागताच सांगळे फरार झाला.
लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत कलम ७ व ७(अ) नुसार गुन्हा क्रमांक २८०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे तसेच अंमलदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अमोल सूर्यवंशी, भूषण पाटील, राकेश दुसाने आणि प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.