पोलिसांनी धाडस दाखवून दरोडेखोरांना पकडण्यात मदत करणाऱ्या नागरिकांचा सत्‍कार केला.  
जळगाव

Jalgaon Crime | भोकर स्टेट बँकेवरील फिल्मी स्टाईल दरोडा पोलिसांच्या चाणाक्ष नाकाबंदीत फसला; ३६ कोटींच्या मुद्देमालासह चौघांना बेड्या!

सुरक्षा रक्षकावर गोळीबार करत लुटले २७ किलो सोने अन् १२ लाखांची रोकड; पोलीस आणि ग्रामस्थांच्या धाडसाने आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर भरदिवसा पडलेला सशस्त्र दरोडा खाकी वर्दी आणि जागरूक ग्रामस्थांच्या अचाट धाडसाने अवघ्या काही तासांत उधळून लावला. सुरक्षा रक्षकावर थेट गोळी झाडून कर्मचाऱ्यांना मारहाण करत बँकेतून तब्बल २७ किलो सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३६ कोटी ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटून पळालेल्या चार सराईत दरोडेखोरांना जळगाव तालुका व धरणगाव पोलिसांनी थरारक नाकाबंदीत जेरबंद केले. आरोपींकडून १०० टक्के मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ ते ३.१५ वाजेच्या सुमारास डोक्यात हेल्मेट आणि तोंडाला रुमाल बांधून चार सशस्त्र दरोडेखोर भोकर येथील एसबीआय शाखेत शिरले. बंदूक, धारदार चाकू आणि लाकडी दांडक्याचा धाक दाखवत त्यांनी शाखा प्रबंधक जयेश दगडू राणे, कॅशियर रणजित मराठे, क्लार्क ऋषिकेश भगत, सुरक्षा रक्षक संदीप कोळी, शिपाई समाधान वराडे, एफओएस सुनील शिरसाठ आणि शिपाई रघुनाथ ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देत बेदम मारहाण केली.

सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी निकराचा प्रतिकार करताच आरोपी शंकर जासक याने त्यांच्यावर जीवे मारण्याच्या उद्देशाने थेट बंदुकीतून गोळी झाडली. त्यानंतर दरोडेखोरांनी स्ट्राँग रूममधील लॉकरमधून १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि ३६ कोटी ३६ लाख २३ हजार रुपये मूल्याचे सुमारे २७ किलो वजनाचे तारण ठेवलेले सोने (८७१ बॅगा) असा एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज बॅगांमध्ये भरून दोन दुचाकींवरून पोबारा केला.

घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांत भोकर येथील संभाजी पवार यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना दूरध्वनीवरून दरोड्याची माहिती दिली. माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तात्काळ नांद्रा बीटचे अंमलदार, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांना सतर्क केले. पोलीस नियंत्रण कक्षाला अलर्ट करून चोपडा, यावल, अडावद आणि धरणगाव मार्गावर पाळत ठेवत डिकसाई येथे तात्काळ कडक नाकाबंदी लावली गेली.

डिकसाई येथे दोघे जागीच पकडले

नाकाबंदीदरम्यान संशयित वाहनाची झडती घेताना पोनि शशिकांत पाटील, नांद्रा बीटचे हवालदार दीपक चौधरी, दिनेश चव्हाण, पोलीस शिपाई प्रवीण कोळी यांनी स्थानिक नागरिक सागर दिलीप कोळी व भगवान भावलाल कोळी यांच्या मदतीने अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण) आणि अंकुश श्रावण चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी, जळगाव) या दोघांना मुद्देमालाच्या बॅगेसह जागीच पकडले.

पकडलेल्या आरोपींच्या चौकशीतून उर्वरित दोघे धरणगावच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळताच नियंत्रण कक्षाने धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक उमाकांत गायकवाड यांना सतर्क केले. गायकवाड यांनी हवालदार सत्यवान पवार, शिपाई मनोज पाटील व ग्रामस्थ चेतन पाटील, बन्सी पाटील यांच्या सहकार्याने धरणगाव मार्गावर सापळा रचून गजानन राजेंद्र पवार आणि माजी पोलीस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक या दोघांना उर्वरित मुद्देमालासह बेड्या ठोकल्या.

सराईत गुन्हेगारांची टोळी; बडतर्फ पीएसआयचा समावेश

अटक करण्यात आलेले चारही आरोपी सराईत असून त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत: शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मन्यारखेडा/खेडदेवी रोड, जळगाव) याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गुन्ह्यावरून याच्यावर यापूर्वी निलंबन व बडतर्फीची कारवाई झालेली आहे.

अंकुश तुळशीराम पवार/चव्हाण (वय २५, रा. खापरखेडा, जि. बुऱ्हाणपूर): मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या पूर्वतयारीचा (कलम ३९९, ४०२ सह आर्म्स ॲक्ट) आणि जामनेर पोलीस ठाण्यात दरोड्याचा (कलम ३९५, ३९७) गुन्हा दाखल.

गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक): चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी कलम ३०२ चा गंभीर गुन्हा दाखल.

अंकुश श्रावण चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी, जळगाव): स्थानिक पातळीवर रेकी आणि पळण्याच्या मार्गांची आखणी करणारा साथीदार.

१०० टक्के मुद्देमाल हस्तगत

रोख रक्कम: १२ लाख २६ हजार ५०० रुपये

सोन्याचे दागिने: सुमारे २७ किलो (८७१ बॅगा, मूल्य ३६ कोटी ३६ लाख २३ हजार रु.)

एकूण जप्त ऐवज: ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपये

वाहने: पल्सर २२० डीटीएस (TS 13 ER 5554) आणि होंडा शाइन १०० (MH 41 BY 6121)

गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल

याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), १०९(१), १२७(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) सह शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ३/२७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी / श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी राहुल गायकवाड, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोनि शशिकांत पाटील, धरणगावचे पोनि उमाकांत गायकवाड, सपोनि नयन पाटील, पोउपनि बडगुजर, पोउपनि जितेंद्र वलटे, स.फौ. अतुल वंजारी, सुनिल पाटील, प्रदीप राजपूत, प्रवीण पाटील, दीपक चौधरी, दिनेश चव्हाण, नरेंद्र पाटील, आशिष चौधरी, गुलाब माळी, प्रवीण कोळी, प्रशांत ठाकूर, मिलींद सपकाळे, दीपक देवरे, गणेश पाटील, तुषार जोशी, चालक अशोक पाटील, बापू कोळी तसेच धरणगावचे अंमलदार आणि स्थानिक ग्रामस्थांच्या पथकाने यशस्वी केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT