जळगाव : भडगाव शहरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटनेप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. मंगळवारी (दि.16) संस्था चालक व संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर संचालकांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये संस्था संचालक, प्राचार्या व वर्गशिक्षकांचा समावेश असून आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. दीपक संभाजी महाजन (वय ५५, रा. पिचर्डे, ता. भडगाव), रमेश एकनाथ महाजन (वय ५६, रा. भडगाव), रविंद्र एकनाथ महाजन (वय ५८, रा. भडगाव), मनोज कौतिक महाजन (वय ५०, रा. भडगाव), विनोद शिवराम महाजन (वय ४५, रा. भडगाव) आणि महिला आरोपी सोनिया भादू वंजारी (वय ३१, रा. पळासखेडे, ता. भडगाव) यांचा समावेश आहे.
भडगाव पोलिसांनी सर्व आरोपींना बुधवारी (दि.17) भडगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जळगाव सब-जेलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे सर्व आरोपींची नंदुरबार सब-जेलमध्ये रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात अद्याप आठ ते दहा आरोपी फरार असून त्यामध्ये शाळा व्यवस्थापनाशी संबंधित इतर जबाबदार व्यक्तींचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबवली जात आहे.
दरम्यान, या दुर्घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकांचे प्राण गेले, असा आरोप पालक व सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.