जळगाव

Jalgaon Bhadgaon School Shocking Incident : संरक्षण भिंतीवरून नाल्यात पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

हृदयद्रावक घटनेनंतर नागरिकांचा शालेय प्रशासनावर रोष

पुढारी वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरातून मंगळवार ( दि.16) रोजी आज सकाळी आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारातील संरक्षण भिंतीवरून घसरून थेट नाल्यात पडल्याने दोन चिमुकल्या बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

शाळेचा निष्काळजीपणा

अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शाळेच्या निष्काळजीपणाबाबत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नेमकी घटना काय?

भडगाव येथील आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्सरी वर्गात शिकणारे हे दोन विद्यार्थी शाळेच्या आवारात खेळत असताना, वर्गाबाहेर असताना संरक्षक भिंतीजवळ पोहोचले. खेळताना अचानक तोल गेल्याने दोघेही भिंतीवरून थेट शाळेलगत असलेल्या नाल्यात पडले. नाल्याच्या पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे

घटनेची माहिती मिळताच पालक, नातेवाईक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शाळेच्या आवारात संतप्त नागरिकांनी शालेय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली?

शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणतीही जाळी किंवा अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. इतक्या लहान वयाच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्या वेळी शिक्षक आणि कर्मचारी कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवण्यात आली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT