Lokkavayitri Bahinabai Choudhari
जळगाव : कान्हदेशच्या मातीचा गंध, कष्टकरी जीवनाचे वास्तव, निसर्ग आणि मानवी जगण्याचे तत्त्वज्ञान सहज, बोलीभाषेतील कवितेतून मांडणाऱ्या लोककवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्याचे चिंतन करणारा ‘बहिणाईंचे भावविश्व’ हा कार्यक्रम बहिणाई स्मृती संग्रहालयात उत्साहात पार पडला. बहिणाबाई चौधरी यांच्या १४६व्या जयंतीनिमित्त बहिणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखक, कवी व नाटककार किरण येले प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. विठ्ठल मंदिर संस्थानचे विलास हरी चौधरी अध्यक्षस्थानी होते. बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी, पणतसून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, अशोक चौधरी, कवी अशोक कोतवाल, सुभाष मराठे, विजय जैन, देवेंद्र पाटील, मू. जे. महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख विद्या व्यवहारे, प्रा. डॉ. योगेश महाले यांच्यासह साहित्य, शिक्षण आणि कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘माह्यी माय सरसोती’ ही सामूहिक कविता सादर केली. रूपाली माळी यांनी ‘माझी मुक्ताई’, तर प्राची शेरे यांनी ‘अरे संसार संसार’ या बहिणाबाईंच्या काव्यरचना सादर केल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कवी किरण येले यांनी आपल्या भाषणातून बहिणाईंचे भावविश्व उलगडून दाखविले. बहिणाबाईंच्या साहित्याचा संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या विचारपरंपरेशी संबंध जोडताना ते म्हणाले, “बहिणाबाई केवळ स्त्री कवयित्री नव्हत्या; त्या समाजाचे वाचन करणाऱ्या संवेदनशील साहित्यिक होत्या. माणूस हा केंद्रबिंदू ठेवून निर्माण झालेले साहित्यच चिरंतन राहते.”
बहिणाबाईंच्या साहित्याचा अनुभव सांगताना संग्रहालयात आल्यानंतर “मंदिरात आल्याचे समाधान” मिळाल्याची भावना येले यांनी व्यक्त केली. त्यांच्या कवितेत शेती, निसर्ग, कष्ट, संसार, नाती आणि सामान्य माणसाच्या जगण्याचे गहिरे तत्त्वज्ञान सामावले असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय संस्कृतीतील दगडातही देव पाहण्याची भावना, माणसामाणसांमधील नाती आणि त्यातील भावबंध यांचा संदर्भ देत येले यांनी नात्यांकडे केवळ जोडणे-तोडणे या व्यवहाराच्या दृष्टीने न पाहता त्यातील संवेदना जपण्याची गरज व्यक्त केली. “हम्प्टी-डम्प्टीप्रमाणे नाती जोडली आणि तोडली म्हणजे त्याला खरे नाते म्हणता येणार नाही,” असे त्यांनी नमूद केले.
“ओठ आणि पोट भरण्यापलीकडे मन भरले पाहिजे,” असे सांगत त्यांनी निसर्गाशी असलेल्या मानवी नात्याचे महत्त्व अधोरेखित केले. गुलमोहराच्या झाडाचे प्रतीकात्मक महत्त्वही त्यांनी विशद केले. कबीर, तुकाराम आणि बहिणाबाई यांनी समाजाकडे केवळ पाहिले नाही, तर समाजाचे अंतरंग अनुभवले आणि ते आपल्या शब्दांतून व्यक्त केले. आपणही जे समजतो, अनुभवतो आणि जगतो, ते कविता, लेखन किंवा अन्य सर्जनशील माध्यमातून व्यक्त केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी स्वतःच्या कवितांचेही विश्लेषण केले.
प्रास्ताविकात गिरीष कुलकर्णी यांनी कान्हदेशच्या साहित्य-संस्कृतीचे जतन, बहिणाबाईंच्या साहित्याचे निरंतर जागरण आणि त्यांचा समृद्ध साहित्यिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘बहिणाईंचे भावविश्व’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी बहिणाबाई आणि महात्मा गांधी यांच्या भेटीचा प्रसंगही उपस्थितांसमोर मांडला.
कार्यक्रमाला चौधरी परिवारातील शोभा, वैशाली, निलिमा, लक्ष्मी, सुनंदा, किरण चौधरी, श्रीधर चौधरी, दिलीप चौधरी यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुनील तायडे, ज्ञानेश्वर सोनार, प्रदीप पाटील, शरद धनगर, समाधान महाजन, अमोल भोलाणकर, विवेक व हितेंद्र चौधरी यांच्यासह सहकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रा. गोपीचंद धनगर यांनी सूत्रसंचालन केले, तर गिरीष कुलकर्णी यांनी आभार मानले.