जळगाव : ग्रामसभेच्या वादातून एका महिलेला आणि तिच्या मुलीला लोखंडी रॉडने गंभीर मारहाण करणारा यावल पोलीस ठाण्यातील फरार पोलीस शिपाई अनिल तायडे (ब.क्र. १३८७) याच्या अखेर मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर खाकीचा रुबाब गळून पडलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याने रविवारी (२३ ऑगस्ट) स्वतः यावल पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले.
अत्रावल गावात २८ मार्च रोजी ग्रामसभा सदस्याच्या वादावरून तक्रारदार विजया तायडे (६०) यांच्याशी आरोपी अनिल तायडे, सागर तायडे आणि माया तायडे यांनी तीव्र वाद घातला होता. या वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन पोलीस शिपाई अनिल तायडेने भरचौकात महिलांना शिवीगाळ करत लोखंडी रॉडने हल्ला चढवला. या प्राणघातक हल्ल्यात आरती तायडे या तरुण मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी यावल पोलिसांत गु.र.क्र. ९१/२०२६ नुसार भा.न्या.सं. कलम १०९(१), १८९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी अनिल तायडे फरार होता. पोलिसांनी ३० जुलै रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करताना आरोपी फरार असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, मा. उच्च न्यायालयाने या गुन्ह्यातील त्याचा थेट आणि सक्रिय सहभाग विचारात घेऊन जामीन अर्ज फेटाळला. न्यायालयाचा दणका बसताच पळवाट बंद झाल्याने आरोपी शिपायाला पोलिसांसमोर लोटांगण घालावे लागले.
खाकीला कलंक; विभागीय कारवाईचा बडगा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने ३१ मार्च रोजीच अनिल तायडेला निलंबित करून प्राथमिक चौकशी सुरू केली होती. २८ जून रोजी सादर झालेल्या चौकशी अहवालानंतर २१ ऑगस्ट रोजी त्याची २ वर्षांची वेतनवाढ रोखण्याची कडक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आता बीएनएसएस कलम १९३ अन्वये पूरक दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे.