Crime News  Pudhari
जळगाव

Amalner Crime | अमळनेरमध्ये जुन्या वादातून डंपर अंगावर घालून खून; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नगाव येथील धक्कादायक घटना; डंपर चालक पोलिसांच्या अटकेत

पुढारी वृत्तसेवा

अमळनेर : जुन्या वादाचा राग मनात धरून आधी चारचाकीने कट मारणे आणि त्यानंतर थेट डंपर अंगावर घालून ५२ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना अमळनेर तालुक्यातील नांदी गावाच्या बसस्थानकाजवळ घडली. शरद रतन पाटील (वय ५२, रा. नगाव बुद्रुक, ता. अमळनेर) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

वाढदिवसाच्या जेवणासाठी जात असताना घडला प्रकार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगाव खुर्दचे पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे पावणेदहा वाजता शरद पाटील, फिर्यादी ज्ञानेश्वर काळूगीर गोसावी आणि गावातील अन्य मित्र जेवणासाठी 'देव हॉटेल'कडे जात होते. दरम्यान, नांदी बसस्थानकासमोरील पानटपरीवर पाण्याची बाटली घेण्यासाठी ते थांबले होते.

याचवेळी पातोंडा गावाच्या दिशेने आलेल्या राखाडी रंगाच्या मारुती ८०० कारने महेश पाटील यांना कट मारला. या प्रकारानंतर कारमधून विपूल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे आणि सागर संजय गोसावी हे तिघे खाली उतरले. काही वेळातच त्यांच्या व्यवसायातील डंपर क्रमांक एचआर-३७-डी-८९५७ घेऊन चालक भरत सुभाष पाटीलही घटनास्थळी दाखल झाला.

जुन्या वादातून थेट डंपर अंगावर घालण्यास चिथावणी

यावेळी 'माणसं मारायला निघालात का?' अशी विचारणा करण्यात आली. त्यावरून जुन्या वादाची कुरापत काढत संशयितांनी वादाला आणखी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. संशयितांनी स्थानिक बोलीभाषेत शिवीगाळ करत डंपर चालकाला शरद पाटील यांच्या अंगावर वाहन घालण्यास प्रवृत्त केले. त्यानंतर शरद पाटील यांना डंपरसमोर ढकलून देण्यात आले. चालक भरत पाटील याने भरधाव वेगात डंपर त्यांच्या अंगावर घातला. डंपरची चाके दोन्ही पायांवरून गेल्याने तसेच अंगावरून वाहन गेल्याने शरद पाटील गंभीर जखमी झाले.

उपचारादरम्यान मृत्यू; परिसरात खळबळ

घटनेनंतर संशयित डंपर आणि कारसह अमळनेरच्या दिशेने पसार झाले. दरम्यान, गंभीर जखमी शरद पाटील यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने अमळनेर येथील नर्मदा मेडिकल फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा; एकाला अटक

या प्रकरणी ज्ञानेश्वर काळूगीर गोसावी यांच्या फिर्यादीवरून विपूल किरण गोसावी, मयूर अनिल बोरसे, सागर संजय गोसावी आणि भरत सुभाष पाटील (सर्व रा. नगाव बुद्रुक, ता. अमळनेर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), १०९ आणि ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी डंपर चालक भरत पाटील याला अटक केली असून, उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.

या घटनेमुळे नगाव परिसरासह अमळनेर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT