जळगाव : मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून समन्वय साधत काम करावे. कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्या, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, अधीक्षक अभियंता गणेश भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी नरवीर रावळ, उपआयुक्त गणेश चाटे, कार्यकारी अभियंता अदिती कुलकर्णी, शहर अभियंता मनीष अमृतकर, तसेच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहायक नासिदूल इस्लाम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन धरणातून विसर्ग नियंत्रित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पाटबंधारे विभागाने नद्यांमधील गाळ तात्काळ काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी, तसेच नदीवरील पूल सुरक्षित राहतील याची खबरदारी घ्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करावी. आरोग्य विभागाने साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध साठा, रुग्णवाहिका आणि कर्मचारी सज्ज ठेवावेत.
पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ हटवावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नगरपालिका प्रशासनांनी सर्वेक्षण करून याबाबतचा अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.
महावितरणने आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना 'आपदा मित्र' म्हणून प्रशिक्षण देण्यात यावे आणि आपत्ती व्यवस्थापन किट वितरित करावेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्व विभागांना दिलेले शोध व बचाव साहित्य तपासून सज्ज ठेवण्याचे आदेश दिले असून, प्रत्येक विभागाने आपल्या कार्यालयात 24x7 नियंत्रण कक्ष सुरू करावा, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.