जळगाव : तंत्रज्ञान ज्या वेगाने प्रगत होत आहे, त्याच वेगाने शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारखी साधने शेतीत प्रभावीपणे वापरण्याची हीच योग्य वेळ आहे. आर्थिकदृष्ट्या परवडणारी, अभियांत्रिकी पद्धतीची शेती विकसित झाली पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमणी मिश्रा यांनी केले.
जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘सायन्स टेक@वर्क’ या हायटेक कृषी महोत्सवात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना डॉ. मिश्रा बोलत होते. ड्रोन पायलट प्रशिक्षणावर भर देण्यात येत असून, त्यातून ड्रोन फवारणीसह विविध शेतीपूरक सेवांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. यासाठी संशोधन संस्था, उद्योग क्षेत्र, शिक्षण संस्था आणि शासन यांचे समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने शेतीतील निविष्ठा खर्च कसा कमी करता येईल, दर्जेदार रोपांची निर्मिती कशी करता येईल, यासाठी शेती क्षेत्रातील आयटी तज्ज्ञ गावोगावी तयार होणे गरजेचे आहे. अशा प्रयत्नांतूनच विकसित भारताची संकल्पना साकार होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी डीडीजी (हॉर्टिकल्चर) डॉ. एन. के. कृष्णकुमार, इंडियन सोसायटी ऑफ सिट्रसचे अध्यक्ष डॉ. दिलीप घोष, पंजाब अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ डॉ. संदीप सिंग, डॉ. एम. कृष्णा रेड्डी, इस्त्रायलचे शास्त्रज्ञ डॉ. अवी सडका, अमेरिकेचे शास्त्रज्ञ डॉ. मंजुनाथन, तसेच जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, डॉ. बी. के. यादव यांच्यासह अनेक तज्ज्ञ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बळीराजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कृषी महोत्सव पाहण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना गांधी टोपी, बागदार रूमाल, तर महिला शेतकऱ्यांना दुपट्ट्यांचे वाटप करण्यात आले.