जळगाव : रावेर तालुक्यातील भोकरी येथे 20 एप्रिल रोजी रात्री मिरवणुकीदरम्यान परवानगीपेक्षा अधिक मोठ्या आवाजात गाणी वाजवणाऱ्या श्री म्युझिकल बँडवर रावेर पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाविरोधात कारवाई केली आहे.
पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या माहितीनुसार, ही रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौथी तर जिल्हास्तरावरील पहिली अधिकृत कारवाई आहे. या घटनेमुळे आयोजकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अत्याधुनिक DB (A) ध्वनी मोजणी यंत्राद्वारे मोजणी केली असता, शासनाने निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे पोलिसांनी आयशर वाहन (MH12 NX 4560) चालक अजय संजय बोरसे (रा. शिरुड, ता. अंमळनेर) याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा 1986 व ध्वनी प्रदूषण (विनियमन व नियंत्रण) अधिनियम 2000 अंतर्गत गुन्हा दाखल केला. अहवाल अधिकृत ध्वनी मापन विभाग, जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, सर्व बँड मालक व मिरवणूक आयोजकांनी शासनाच्या नियमानुसारच वाद्ये वाजवावीत, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल. डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील व पोलीस कॉन्स्टेबल नितीन सपकाळे यांनी ही कारवाई केली.