जळगाव : वाहन परवाना नसताना देखील शहरांमधील कॉलेजमध्ये व क्लासेसला जाणारे अल्पवयीन विद्यार्थी वाहने चालवत असल्याने अशा अल्पवयीन वाहनधारकांवर सोमवार (दि.6) रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी व वाहतूक शाखाचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार वाहतूक शाखेचे कर्मचारी यांनी कारवाई केली. या कारवाईत 100 वाहने जळगाव शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आलेली आहे. तर दुपारी दोन वाजेपर्यंत एक लाखाचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या महिन्याभरात जुन्या दंडाच्या रकमेपैकी 25 लाखाची वसुली करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी माहिती दिली.
परिवहन विभागाकडून 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच वाहन चालवण्याचा परवाना विद्यार्थ्यांना किंवा नागरिकांना देण्यात येतो. मात्र काही पालकांकडून अल्पवयीन विद्यार्थ्यांना वेळेत बचत व्हावी म्हणून मोठ्या प्रमाणात क्लासेसला किंवा कॉलेजला जाण्यासाठी दुचाकी वाहने सर्रासपणे वाहने चालविण्यास देण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी बेशिस्तपणे वाहने चालवित अपघाताला निमंत्रण देत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी व जळगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सोमवार (दि.6) रोजी अशा विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तसेच 25 नोव्हेंबर ते आठ डिसेंबर या कालावधीमध्ये थकीत असलेल्या दंड रकमेपैकी 25 लाख वसूल करण्यात आलेला आहेत
याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, मुले अल्पवयीन असून क्लासेसला किंवा कॉलेजला जाताना बरेच ठिकाणी मुले वाहन वेग मर्यादा पाळत नाहीत. काही ठिकाणी एक ट्रिपल सीट अशी वाहने चालविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. भविष्याच्या दृष्टीने हे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.