जळगाव : मासे घेण्यासाठी दुचाकीवरून जात असलेल्या युवकाला भरधाव काँक्रीट मिक्सरने चिरडल्याची हृदयद्रावक घटना (दि.2) रोजी उमाळा गावाजवळ घडली. या अपघातात साहिल मोहम्मद खाटीक (वय २३, रा. बिलाल चौक, तांबापुरा, जळगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
साहिल खाटीक शनिवार (दि.2) रोजी सकाळी (एमएच १९ ईक्यू ३१३२) क्रमांकाच्या दुचाकीने मासे घेण्यासाठी निघाला होता. दरम्यान, उमाळा गावाजवळ (एमएच १५ जीव्ही ५६३०) क्रमांकाच्या भरधाव काँक्रीट मिक्सरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर साहिल रस्त्यावर फेकला गेला आणि मिक्सरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचा देखील चुराडा झाला आहे.
घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने साहिलचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती तांबापुरा परिसरात पोहोचताच साहिलच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. मुलाचा मृत्यू झाल्याचे समजताच वडील आणि कुटुंबीयांनी आक्रोश केला. रुग्णालयात नातलगांची मोठी गर्दी झाली होती. साहिलच्या पश्चात आई-वडील व चार बहिणी असा परिवार आहे. या दुर्घटनेने तांबापुरा परिसरात शोककळा पसरली आहे.