जळगाव : तरसोद ते पाळधी बायपास महामार्ग नादुरूस्तीमुळे शहरातून वाहतूक वळविल्याने आज पुन्हा अपघात झाला. यात तरूणाचा बळी गेल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच अजिंठा चौफुलीजवळ भाजी विक्रेत्या महिलेचा टँकरने चिरडल्यामुळे मृत्यू झाला होता. यानंतरही जळगाव शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गुरुवारी (दि.20) सकाळी सात वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अॅक्टिव्हास्वार योगेश महाजन या युवकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश महाजन हा इच्छदेवी चौक परिसरात राहत होता. तो ॲक्टीव्हा वाहनावरून जात असतांना अवजड वाहनाने त्याला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, त्या युवकाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तरसोद-पाळधी बायपासच्या दुर्दशेमुळे महामार्गावरील जड वाहतूक शहरातून जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वाढत्या वाहतुकीमुळे शहरातील विविध मार्गांवर सतत अपघात होत असून लोकांचे जीव जात आहेत.
या समस्येवर नेमका कायमस्वरूपी उपाय कधी होणार, हा मोठा प्रश्न आता प्रशासनासमोर आहे. बायपास मार्गाची व्यवस्था लवकरात लवकर दुरुस्त करून वाहतूक शहराबाहेर वळवली जावी आणि अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.