File Photo  
जळगाव

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाचखोरीचा पर्दाफाश; महसूल सहायकासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या गळाला

पुढारी वृत्तसेवा

जळगाव: अतिक्रमण प्रकरणातील कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायकासह एका खाजगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. मंगळवारी (दि.२२) सायंकाळी झालेल्या या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशांत सुभाष ठाकूर (वय ४९, सहायक महसूल अधिकारी, अभिलेख शाखा) आणि संजय प्रभाकर दलाल (वय ५८, खाजगी नोकरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे नेमके प्रकरण?

या प्रकरणातील तक्रारदाराने त्यांच्या गावातील ग्रामपंचायत आणि सदस्यांविरुद्ध दाखल असलेल्या एका अतिक्रमण प्रकरणाच्या कागदपत्रांच्या नकला मिळवण्यासाठी १६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र, कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत होते.

यादरम्यान त्यांची भेट अभिलेख शाखेतील सहायक महसूल अधिकारी प्रशांत ठाकूर आणि कार्यालयात वावर असणारा खाजगी इसम संजय दलाल यांच्याशी झाली. दोघांनी कागदपत्रांच्या नकला काढून देण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने २३ रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली.

असा रचला सापळा

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सापळा रचला. आरोपी संजय दलाल याने तक्रारदाराकडे, "शासकीय फी आणि झेरॉक्सचे १४०० रुपये आणि आमचे ६०० रुपये," असे म्हणून एकूण २००० रुपयांची मागणी केली. यावेळी, महसूल सहायक प्रशांत ठाकूर याने ही रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले. मंगळवारी सायंकाळी ठरल्याप्रमाणे संजय दलाल याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ पकडले. तपासात असे निष्पन्न झाले की, कागदपत्रांसाठी लागणारे शासकीय शुल्क केवळ ८८० रुपये होते, तर उर्वरित ११२० रुपये लाच म्हणून स्वीकारण्यात आले होते.

गुन्हा दाखल, पथकाचे कौतुक

याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध जळगावच्या जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पो.ना. बाळू मराठे आणि पो.कॉ. अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमध्ये काम अडवून लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT