जळगाव : वाळूने भरलेला डंपर सोडून देण्यासाठी आणि त्यावर कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची मागणी करून तडजोडी अंती ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या ममुराबादच्या तलाठ्यासह मसावदच्या मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज बेड्या ठोकल्या. सदानंद व्यंकटी मुढे (तलाठी) आणि अभिजित नामदेव येवले (मंडळ अधिकारी) अशी या अधिकाऱ्याची नावे असून, या कारवाईमुळे जळगावच्या महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री गस्तीवर असताना ममुराबाद सजाचे तलाठी सदानंद मुढे यांनी वाळूने भरलेला एक डंपर पकडला होता. मात्र, गसावदचे मंडळ अधिकारी अभिजित येवले यांनी मुढे यांना फोन करून 'डंपर सोडून दे' असे सांगितले. त्यानुसार डंपर सोडण्यात आला खरा, पण हा 'उपकार' फुकट नव्हता. कारवाई टाळल्याच्या बदल्यात या दोन्ही लोकसेवकांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
'एसीबी'चा सापळा आणि कारवाई
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ११ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. तक्रारीची पडताळणी केली असता, ५० हजारांची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला. मंडळ अधिकारी अभिजित येवले यांच्या जळगाव येथील घराच्या खाजगी कार्यालयात ही लाचेची रक्कम स्वीकारण्याचे ठरले होते. यावेळी ३० हजारांची रोकड स्वीकारताना तलाठी सदानंद मुढे याला 'एसीबी'ने रंगेहात पकडले.
मुद्देमाल जप्त
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता:
तलाठी सदानंद मुढे : ४०,२०० रुपये रोख आणि एक विवो मोबाईल.
मंडळ अधिकारी अभिजित येवले : ७,६०० रुपये रोख आणि एक विवो मोबाईल. असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, रेशमा अवतारे, सुरेश पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रदीप पोळ आणि चंद्रशेखर चौधरी यांच्या पथकाने केली.