जळगाव : बंद घर फोडून चोरट्यांनी घरातून सोन्या- चांदीसह इतर सामान असा ३६ लाख ८३ हजार मुद्देमाल चोरून नेला होता. ही घटना जिल्ह्यातील काळे नगर मोहरी रोड येथे घडली होती. याप्रकरणी रामानंद पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून ३३ लाख ७९ हजार रुपयाचे सोन्याचांदीची लगड व एक मोटरसायकल जप्त केली. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी (दि.२६) पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, काळे नगर मोहरी रोड येथील सांडू नरेंद्र वाघ हे कुटुंबियांसह परदेशात फिरायला गेले होते. यादरम्यान बंद घर फोडून चोरट्यांनी घरातून सोन्या- चांदीसह इतर सामान असा ३६ लाख ८३ हजार मुद्देमाल चोरून नेला होता. घरी परत आल्यानंतर त्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी रामानंद पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली होती. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास करत रवी प्रकाश चव्हाण (वय २१) शेख शकील शेख रफिक (वय ३९, रा. माऊली मुक्काम सालार नगर जळगाव) जुनेद उर्फ मुस्तकीन भिकन शहा (रा. शिरसोली) गुरुदयाल सिंग मंजीत सिंग टाक (रा. शिरसोली नाका तांबापुरा जळगाव) यांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरीची कबुली दिली.