Jalgaon Family Canal Attack Pudhari
जळगाव

Jalgaon Family Canal Attack: गिरीश महाजनांचा सुरत पोलिसांना फोन; जळगावच्या कुटुंबाच्या हत्याकांडामागचं धक्कादायक कारण आलं समोर

Jalgaon Family Canal Attack: रोजगाराच्या शोधात गुजरातला निघालेल्या जळगावच्या पाटील कुटुंबाला सुरतमधील बारडोलीजवळ चार जणांनी कालव्यात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Rahul Shelke

Jalgaon Family Canal Attack: रोजगाराच्या शोधात जळगाव जिल्ह्यातून गुजरातला निघालेल्या एका कष्टकरी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात चार जणांनी या कुटुंबाची गाडी अडवून सर्वांना जबरदस्तीने कालव्यात ढकलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत कुटुंबातील आई-वडिलांसह पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. दरम्यान, १३ वर्षीय मुलाने कालव्याला असलेला पाईप पकडून आपला जीव वाचवला. त्याने दिलेल्या माहितीमुळे या घटनेचा उलगडा झाला.

मात्र या घटनेला आता वेगळे वळण लागले आहे. जळगावचे मंत्री गिरीश महाजन यांनी सुरत पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब एका विमा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात साक्षीदार होते. त्यामुळे साक्षीदारांनाच संपवण्यासाठी हा प्रकार घडवण्यात आल्याचा संशय सुरत पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रोजगाराच्या शोधात गुजरातला निघाले होते कुटुंब

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारखान्यात मजुरी करणारे नितीन ऊर्फ भुरिया पाटील हे आपल्या कुटुंबासह २१ नोव्हेंबर रोजी रोजगाराच्या शोधात सुरतकडे निघाले होते. त्यांची गाडी बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळील कालव्याच्या परिसरात पोहोचली. त्याचवेळी दुसऱ्या एका कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांच्या गाडीला अडवले.

त्यानंतर आरोपींनी पाटील कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने गाडीतून बाहेर काढले. त्यांना थेट कालव्याच्या खोल पाण्यात ढकलून दिले. हा प्रकार घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

१३ वर्षीय मुलाने पाईप पकडून वाचवला जीव

कालव्याच्या पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने कुटुंबातील सदस्य वाहून जाऊ लागले. मात्र, १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत कालव्याला बसवलेला एक पाईप घट्ट पकडला. पाण्याच्या प्रवाहाशी झुंज देत त्याने स्वतःचा जीव वाचवला.

कालव्याबाहेर आल्यानंतर त्याने जवळच्या हॉटेलमध्ये धाव घेतली. तेथील नागरिकांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस आणि अग्निशमन दलाने तातडीने शोधमोहीम सुरू केली.

पाच जणांचे मृतदेह आढळले

पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी कालव्यात शोधमोहीम राबवली. यावेळी महुवा तालुक्यातील डुंगरी परिसरात पाच मृतदेह आढळले. नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली आहे. मृतांमध्ये नितीन ऊर्फ भुरिया पाटील, कविता पाटील आणि एका तरुणीचा समावेश असल्याचे समोर आले.

विमा घोटाळ्याचे साक्षीदार असल्याने कुटुंबाला लक्ष्य केल्याचा संशय

या प्रकरणात आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी सुरत पोलिसांशी संपर्क साधून जळगावमधील मृत कुटुंबाबाबत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंब विमा घोटाळ्याच्या प्रकरणात साक्षीदार होते.

या प्रकरणातील साक्षीदारांना संपवण्याच्या उद्देशानेच कुटुंबावर हल्ला करण्यात आल्याचा संशय सुरत पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्याचे महाजन यांनी सांगितले. त्यामुळे या घटनेमागे केवळ वैयक्तिक वाद नसून विमा घोटाळ्याशी संबंधित कारण असण्याची शक्यता तपासली जात आहे.

आरोपींच्या शोधासाठी आठ पोलीस पथके तैनात

या घटनेची सुरत ग्रामीण पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. बारडोली ग्रामीण पोलीस ठाण्यात खंडियो, अभो, बंटी आणि एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आठ स्वतंत्र पथके तयार केली आहेत. तसेच विमा घोटाळ्याचे साक्षीदार असलेल्या या कुटुंबावर हल्ला करण्यामागे नेमके कोणते कारण होते, आरोपींनी हा कट कसा रचला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

रोजगाराच्या शोधात घराबाहेर पडलेल्या एका कुटुंबावर आलेल्या या संकटामुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT