जळगाव: जिल्ह्यातील गिरणा नदीतील वाळूला मोठी मागणी आहे. अधिकृत वाळू ठेके काही ठिकाणीच मंजूर असतानाही इतर भागातून, विशेषतः बांभोरी पुलाजवळून, भर दिवसा वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याचे समोर आले आहे.
नियमानुसार कोणत्याही पुलापासून किमान 200 मीटर अंतरावरच वाळू उपसा करता येतो. मात्र बांभोरी पुलाजवळ हा नियम पायदळी तुडवला जात आहे. पुलाच्या अगदी जवळून ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा आणि अवैध वाळूची वाहतूक उघडपणे सुरू असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
गिरणा वाळूचे समीकरण हे जळगाव जिल्ह्यासाठी जुने आहे. या वाळूची मागणी केवळ जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या भागांतही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अवैध वाळू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
पालकमंत्र्यांच्या पाळधी गावाला आणि जळगाव शहराला जोडणारा बांभोरी पूल हा महत्त्वाचा पूल आहे. या पुलाच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा होत असून, भर दिवसाही वाळू चोरी सुरू असते. नियम असूनही संबंधित विभागांकडून कारवाई होत नसल्यामुळे स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांचा प्रश्न असा आहे की, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार आणि गौण खनिज विभागाचे अधिकारी कारवाईस का धजावत नाहीत? असा प्रश्न निमार्ण होत असून भर दिवसा उघडपणे सुरू असलेली ही वाळू चोरी थांबवली जाणार की नाही, असे संतप्त प्रश्न उद्भवत आहेत.