भडगाव : भडगाव तालुक्यातील नदीपात्रातून महसूल प्रशासनाचे कोणतेही परमिट नसताना नदीपात्रातून वाळू तस्करी करणाऱ्या वाळूमाफियांवर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. भडगाव नदीपात्र, बोदडे परिसर आणि वाक रस्त्यावरून विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारे तब्बल चार डंपर आणि १७ ब्रास वाळू असा एकूण ८६ लाख ३७ हजार ९०४ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात चार वाळू तस्करांविरुद्ध चोरीसह जमीन महसूल अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भडगाव तालुक्यात गिरणा नदीपात्र व परिसरातील ओढ्यांमधून रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार निवासी नायब तहसीलदार सुधीर किटकुल सोनवणे यांनी महसूल पथकासह वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या.
२२ ऑक्टोबर रोजी रात्री ११.०५ वाजेच्या सुमारास मौजे बोदडे येथील नदीपात्राजवळ छापा टाकला असता संशयित आरोपी महेश दगा पाटील (रा. कोठली, ता. भडगाव) हा २० लाख रुपये किमतीच्या डंपरमधून (क्र. एच आर -18-सी-3170) विनापरवाना १ लाख १८ हजार १५० रुपये किमतीची ५ ब्रास वाळूची चोरटी वाहतूक करताना आढळून आला. याप्रकरणी २१ लाख १८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भडगाव नदीपात्र परिसरात २६ ऑक्टोबर रोजी सकाळी भडगाव येथील नदीपात्रातून गुढे गावाकडे जात असताना संशयित आरोपी रघुनंदन एकनाथ पाटील (रा. कोठली, ता. भडगाव) हा डंपर (एम.एच-14-8914) मधून १ लाख ५९ हजार ९१८ रुपये किमतीची ६ ब्रास वाळू चोरून नेताना मिळून आला. त्याच्याकडून २१ लाख ५९ हजार ९१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास वाक रस्त्यावर दोन डंपर अडवण्यात आले. यात रोहित लालचंद वाघ (रा. चाळीसगाव) याचा डंपर (क्र. 41-8668 आणि पवन दुर्योधन नायकवाडे (रा. भोयेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) याचा डंपर क्र. (41-8334) या दोन्ही वाहनांमधून प्रत्येकी ६ ब्रास अशी एकूण १२ ब्रास वाळू (किंमत ३ लाख १९ हजार ८३६ रुपये) आणि ४० लाख रुपयांचे दोन डंपर असा एकूण ४३ लाख १९ हजार ८३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही कारवायांमध्ये मिळून ८० लाख रुपयांचे ४ डंपर आणि ६ लाख ३७ हजार ९०४ रुपयांची १७ ब्रास वाळू असा एकूण ८६ लाख ३७ हजार ९०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी निवासी नायब तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात आरोपी १) महेश दगा पाटील (रा. कोठली), २) रघुनंदन एकनाथ पाटील (रा. कोठली), ३) रोहित लालचंद वाघ (रा. चाळीसगाव) आणि ४) पवन दुर्योधन नायकवाडे (रा. भोयेगाव, जि. नाशिक) यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. प्रदीप चौधरी, पोहेकॉ किशोर सोनवणे आणि स.फौ. संजय पाटील पुढील तपास करत आहेत. एकाच दिवशी दाखल झालेल्या या तिन्ही गुन्ह्यांमुळे तालुक्यातील अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.