जळगाव: पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणे आणि माहेरून घर बांधण्यासाठी दहा लाख रुपये आणण्याचा तगादा लावणे, यातून निर्माण झालेल्या कौटुंबिक वादाने पाचोरा तालुक्यात क्रूर रूप धारण केले आहे. पतीनेच धारदार शस्त्राने वार करून पत्नीची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे, हे अमानुष कृत्य केल्यानंतर आरोपी पती स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
या प्रकरणी मयत अर्चना उर्फ कविता शिंदे (वय २८) यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती नितीन शिंदे आणि सासूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पतीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी असलेला आरोपी नितीन दौलत शिंदे हा त्याची पत्नी अर्चना उर्फ कविता हिच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. यावरून तो तिला सातत्याने शिवीगाळ करून मारहाण करत होता, अशी माहिती समोर आली आहे. काही काळापूर्वी अर्चनाच्या माहेरची शेतजमीन विकण्यात आली होती. तेव्हापासून नितीनने घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणण्यासाठी तिच्यामागे तगादा लावला होता. या दोन प्रमुख कारणांमुळे पती-पत्नीत रोज वाद होत होते. पती नितीन सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. घर बांधण्यासाठी माहेरून १० लाख रुपये आणण्यासाठी तो तिच्यावर दबाव टाकत होता. याच वादातून २० ऑगस्ट रोजी रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास नितीनने अर्चनावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात अर्चना गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी नितीन शिंदे याने स्वतः लोहारा दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात हजर होऊन आपणच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. या अनपेक्षित कबुलीमुळे पोलीसही चक्रावले. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी मयत अर्चनाचा भाऊ आकाश सपकाळ (रा. सिल्लोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती नितीन दौलत शिंदे आणि त्याच्या आईविरोधात (सासू) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक हिंसाचाराचा हा क्रूर चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.