Jalgaon Hatnur Dam Gates Opened Pudhari
जळगाव

Hatnur Dam | तापी-पूर्णा खोऱ्यात मुसळधार पाऊस; हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची धरणावर पाहणी

पुढारी वृत्तसेवा

Jalgaon Hatnur Dam Gates Opened

जळगाव : तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या 'येलो अलर्ट'दरम्यान ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या संततधार पावसामुळे हतनूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली. परिणामी, शुक्रवारी ( दि. ३१ ) सकाळी सुमारे ११ वाजता धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

यंदाच्या हंगामातील सर्वाधिक ८९७.४ मिलिमीटर पावसाची नोंद ३१ जुलै रोजी पाणलोट क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा कहर

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, देढतलाई तसेच मेळघाटातील चिखलदरा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. बऱ्हाणपूर येथे १३७.४ मिमी, देढतलाई येथे ९४ मिमी, चिखलदरा येथे ७६.४ मिमी आणि टेक्सा येथे १३.४ मिमी पावसाची नोंद झाली.

पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी झाली असून एरंडी येथे तब्बल २३४ मिमी पाऊस झाला. तसेच लोहारा येथे १२०.४ मिमी, अकोला येथे ८१ मिमी, गोपाळखेड येथे ६४.८ मिमी आणि लाखपुरी येथे ४७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत तापी-पूर्णा खोऱ्यात एकूण ३,९७५ मिलिमीटर पर्जन्याची नोंद झाली असून, ३१ जुलै हा यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची धरणस्थळी पाहणी

धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हतनूर धरणावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी धरणाची स्थिती, विसर्गाची प्रक्रिया आणि प्रशासकीय तयारीची पाहणी करत पाटबंधारे विभागासह संबंधित अधिकाऱ्यांना २४ तास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या.

नदीपात्रापासून दूर राहण्याचे आवाहन

हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, पोहण्याचा अथवा मासेमारीचा प्रयत्न करू नये, तसेच शेतकऱ्यांनी जनावरे, शेतीची अवजारे किंवा अन्य साहित्य नदीकाठी नेऊ नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने केले आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT